Anjali Patil | (File Image)

उमेदवारी अर्ज दाखल करत असताना वादग्रस्त ठरलेल्या तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील (Third Gender Anjali Patil) यांचा विजय झाला आहे. अंजली पाटील (Anjali Patil) यांच्या रुपात जळगावमध्ये प्रथमच तृतीयपंथी उमेदवार विजयी झाला आहे. जळगाव (Jalgaon ) जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत (Bhadli Budruk Gram Panchayat) निवडणुकीत वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील (गुरू संजना जान - Guru Sanjana Jaan)विजयी झाल्या आहेत. अंजली पाटील यांनी महिला प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल केली होती.  ही उमेदवारी दाखल करतानाही अंजली पाटील यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांची उमेदवारी सहजपणे स्वीकारली गेली नाही. त्यासाठी त्यांना आपल्या हक्कासाठी न्यायालयाचा दरवाजाही ठोठवावा लागला.

निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली हरकत

अंजली पाटील यांनी महिला प्रवर्गातून निवडणूक अर्ज दाखल केला. या वेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी अंजली पाटील (गुरू संजना जान) यांच्या उमेदवारी अर्जास निवडणूक अधिकाऱ्यांनी हरकत घेतली. अंजली पाटील यांनी त्यांच्या नावासमोर लिंगाचा उल्लेख करवा असा अग्रह धरला. पाटील यांनी अर्जापुढे इतर असा उल्लेख केला होता. (हेही वाचा, Hiware Bazar Gram Panchayat: पोपटराव पवार यांचे ग्रामविकास पॅनल विजयी; 30 वर्षांनीही इतिहास बदलला नाही)

न्यायालयात दाद मागून मिळवली उमेदवारी

दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक अर्जाला हरकत घेतल्यावर अंजली पाटील यांनी सहकारी तृतीयपंथी शमिभा पाटील यांच्या सहकार्याने उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंजली पाटील यांची बाजू ऐकून घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा निवडणूक अर्ज स्वीकारावा असे आदेश दिले.

आता फक्त गावचा विकास

अंजली पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 'आता फक्त एकच ध्यास गावचा विकास' अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत मत आणि पाठिंबा देऊन सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभारही अंजली पाटील (गुरू संजना जान) यांनी मानले आहेत.