कोरोना व्हायरस (Coronavirus ) महामारी गेली असे जर तुमचे मत असेल तर तुमचा अंदाज काहीसा चुकतो आहे. सध्याची स्थिती ही गाफील राहण्याची नव्हे तर अधिक सतर्क राहण्याची आहे. देशभरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हे म्हणायची वेळ आली आहे. देशातील कोरोना संक्रमितांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाठिमागील 24 तासांत देशभरात 16 हजार 561 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या आधिप्रमाणेच राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरना संक्रमितांचा आकडा अधिक वाढताना दिसतो आहे. त्यामुळे सावध ऐका पुढच्या हाका असेच म्हणायची सध्याची तरी वेळ आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, काल म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी देशात 16 हजार 299 नवीन रुग्ण आढळले होते. आजचा विचार करता कालच्या तुलनेत देशभरामध्ये वाढलेल्या सक्रीय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.28% इतके आहे. अर्थात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. हे प्रमाण 98.53% इतके आहे. (हेही वाचा, Langya Virus: चीनमध्ये सापडला 'लांग्या' नवीन विषाणू; आतापर्यंत 35 जणांना लागण, जगभरात चिंतेत वाढ)
देशातील प्रतिदिन रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब अशी की, कोरोनासंक्रमितांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रमाण प्रतिदिन 5.44% इतके आहे. शेवटची माहिती हाती आली तेव्हा केद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे की, देशात 1 लाख 23 हजार 535 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 35 लाख 73 हजार 94 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, राजधानी दिल्लीमध्ये मास्कचा वापर करणे नागरिकांसाठी बंधनकारक केले जात आहे. दिल्ली हे आंतरराष्ट्रीय शहर आणि राजधानीचे ठिकाण असल्यामुळे सहाजिकच देशविदेशी नागरिकांच्या प्रवासाचे केंद्रस्थान असणार आहे. परिणामी संभाव्य धोका टाळण्यासाठी वाढती रुग्णसंख्या विचारात घेत दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे.