Whatsapp किंवा Social Media वर कोणत्याही जाती, धर्माबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांनो सावधान; पोलिसांनी दिला कडक कारवाईचा इशारा (See Tweet)
जाती, धर्माबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या लोकांना कडक कारवाईचा इशारा (Photo Credit : Thane Police)

गेल्या काही वर्षांपासून देशात सुरु असलेला जातीयवाद सोशल मिडियावरही (Social Media) दिसू लागला आहे. विविध जातीच्या लोकांना टार्गेट करून सोशल मिडियावर अनेक आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Posts) व्हायरल होत असलेल्या दिसत आहेत. यामुळे समाजात जातीय द्वेष वाढीला लागून अनेक हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. आता याबाबत पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे जात/धर्म/वंश इ. बाबत पोस्ट करणाऱ्या लोकांनी सावधान, अशा पोस्ट पोलिसांच्या निदर्शनास आल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत नुकतेच ठाणे पोलिसांनी (Thane Police) ट्वीट करत माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये ठाणे पोलीस म्हणतात, ‘नागरिकांनी समाजमाध्यमावर पोस्ट/माहिती प्रसारित करताना कोणत्याही जात/धर्म/वंश इ.बाबत आक्षेपार्ह माहिती प्रसारित होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. समाजमाध्यमावर प्रसारित होणार्या पोस्ट/व्हिडीओ/मजकुर यावर पोलिसांकडुन निगराणी ठेवण्यात येत असुन, अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट करणा-या व्यक्ती विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येते. याअनुषंगाने नागरिकांनी समाजमाध्यमावर माहिती प्रसारित करताना विशेष दक्षता घ्यावी.’ ठाणे पोलीस आयुकतालयाने याबाबत माहिती दिली आहे.

(हेही वाचा: Bahrain च्या दुकानात दोन महिलांकडून गणेश मूर्तींची तोडफोड; सोशल मिडियावर नेटिझन्सच्या संतापानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल)

अनेकदा सोशल मिडीयावर एका विशिष्ट धर्माला किंवा वंशाला संबोधून अनेक आक्षेपार्ह पोस्ट्स टाकल्या जातात. लोकही विचार न करता अशा पोस्ट्स पुढे पाठवतात. यामुळे समाजातील वातावरण बिघडून भांडण, तंटे उद्भवतात. काही वेळा तर अशा गोष्टींची परिणती हिंसेत होते. याच गोष्टी टाळण्यासाठी आता पोलीस दक्ष झाले आहेत व त्यामुळे त्यांनी अशा पोस्ट टाकणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पोलिसांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असून यामुळे जातींमधील तेढ कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, फेस्बुकाही अशा गोष्टींच्या बाबतीत दक्ष असून कोणीही धर्माबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्या काढून टाकण्यात येतील असे सांगितले आहे.