Best Employees Strike: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप ; प्रवाशांचे होणार हाल
बस कर्मचारी संप (फोटो सौजन्य- ANI)

Best Employees Strike: मुंबईत बेस्ट कर्माचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी अखेर सोमवारी मध्यरात्रीपासूनच संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना प्रवासाचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील बस वाहतूक सेवा मंगळवार (8 जानेवारी) ठप्प होण्याची शक्यता आहे.

लोकल सेवेनंतर मुंबईतील प्रवासी हे बस वाहतूकीचा अवलंब करतात. मात्र गेली काही वर्ष बेस्ट आर्थिक संकटांतून जात आहे. तसेच महानगरपालिकेकडून ही कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील अशी आश्वासने दिली जातात. महापालिकेची ही सर्व आश्वासने काही दिवसांनी फोल ठरली जातात. तर संप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार संघटना यांच्यामध्ये एक बैठक घेण्यात येणार होती. परंतु बैठकीला बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी उपस्थिती लावलीच नसल्याचा प्रकार घडला आहे. (हेही वाचा-Bharat Bandh, Bank Strike, BEST Strike: मुंबईकरांना 8,9 जानेवारीच्या 'भारत बंद' मध्ये कोणत्या सेवा मिळणार, कशाचा फटका बसणार?

वेतनवाढ, वेतननिश्चिती आणि बेस्ट अर्थसंकल्पाचे महापालिका 'अ' अर्थसंकल्पात विलिनीकरण यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बंदची हाक पुकारली आहे. त्यामुळे तब्बल 25 लाख प्रवाशांना बेस्ट संपाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे बागडे यांनी सांगितले आहे.