बीड (Beed) जिल्ह्यात काही खाजगी डॉक्टरांनी काहीच दिवसात तब्बल 4500 हुन अधिक महिलांचे ऑपरेशन करून गर्भाशय काढून टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेच्या अधिवेशनात (Assembly Session) माहिती देत सरकारने यामध्ये जातीने लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. बीड मधील शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या नीलम गोऱ्हे, (Neelam Gorhe) यांनी देखील या माहितीची पुष्टी करत खाजगी डॉक्टरांनी इतक्या जास्त प्रमाणात शस्त्रक्रिया कशा केल्या असा सवाल उभा केला आहे. नीलम यांच्या माहितीनुसार, या सगळ्या महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत घरातील असून त्या सध्या उसाच्या मळ्यांमध्ये मजूर म्हणून काम करतात.
नीलम गोर्हे यांनी या प्रकारानंतर डॉक्टरांच्या हेतूवर देखील संशय व्यक्त केला, त्यांच्या मते या महिलांना कोणताही गंभीर आजार नाहीये त्यामुळे त्यांचे गर्भाशय काढून टाकण्याचे काहीच कारण नव्हते. याउलट ही डॉक्टर्स आणि काँट्रॅक्टर्सची चाल असू शकते, गर्भाशय काढून टाकल्यावर महिलांना मासिक पाळी येत नाही त्यामुळे त्यांना त्या काळात सुट्टी देण्याचा प्रश्नच उरणार नाही, हा विचार करून या महिला ज्या ठिकणी मजुरी करतात तिथल्या कंत्राटदाराने असा डाव रचला असण्याची शक्यता नीलम यांनी मांडली .
दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आरोग्य मंत्रालयांच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात संबंधित महिलांशी बोलून ही समिती बीड सह अन्य ठिकाणच्या समान घटनांचा अभ्यास मांडणारा एक अहवाल सादर करेल. यासोबतच आवश्यकता नसल्यास महिलांच्या गर्भाशय काढून टाकणे टाळावे असे निर्देश राज्यातील डॉक्टरांना देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त बीड मधील धक्कादायक वास्तव! अनेकींना घ्यावा लागला 'गर्भाशय' काढून टाकण्याचा निर्णय
हा प्रकार एप्रिल महिन्यातच समोर आला होता त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र देखील लिहिण्यात आले होते, मात्र आता समोर आलेल्या या इतक्या मोठ्या आकड्यांमुळे हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.