माजलगांव नगर परिषद (Majalgaon Municipal Council) नगराध्यक्षपद पद रिक्त करत असल्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) यांनी दिले आहेत. नगराध्यक्ष सहाल चाऊस (Sahal Chaus) यांना पदावरुन हटविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हे पद रिक्त झाले आहे. दरम्यान, माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस हे 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून निवडूण आले होते. मात्र, पाठिमागील 17 मार्च म्हणजेच गेल्या तीन महिन्यांपासून चाऊस हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
नगराध्यक्ष सहाल चाउस गेले तीन महिने 23 दिवस न्यायालयीन कोठडीत असल्याने दरम्यानच्या काळात नगर परिषेची एकही बैठक होऊ शकली नाही. तसेच, चाऊस यांनी गैरहजर राहण्याबाबतही यापूर्वी कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच पदभारही हस्तांतरीत केला नाही. आदी कारणांमुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माजलगाव नगरपरिषद नगराध्यक्षपद रिक्त असल्याबाबतचे आदेश काढल्याचे समजते. जिल्हाधिकारी रेखावार यांनी नगर परिषदा नगर पंचायत अधिनियम १९६५ चे कलम ५६;३ नुसार सदर पद रिक्त असल्याचे आदेश काढल आहेत. (हेही वाचा, माजलगाव नगरपालिकेत 5 कोटींचा आर्थिक घोटाळा; भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊससह दोन मुख्यधिकाऱ्यांना अटक, कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी)
माजलगाव नगर परिषद गेले चार महिने विविध आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे चांगलीच गाजत आहे. या सर्व प्रकरणात अध्यक्ष सहाल चाऊस यांना जबाबदार असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सहाल यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मार्च 2020 पासून सहाल चाउस हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे सध्यास्थितीत नगराध्यक्ष पदाचा कार्यभार कोणाकडेच देण्यात आले नाही.
दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या पदावरुन शह-काटशहाचे चांगलेच राजकारणही रंगले. चहाल यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचाही प्रयत्न झाला. परंतू, तो यशस्वी होऊ शकला नाही. मात्र, हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नगर परिषदा नगर पंचायत अधिनियम १९६५ चे कलम ५६;३ अन्वये परवानगी न घेता सतत तीन महिने गैरहजर असल्याचे कारण दाखवत दाखवून कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी व अध्यक्ष पदाचा पदभार देण्या बाबतची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. या मागणीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुनावणी घेऊन माजलगांवचे नगराध्यक्ष पद हे रिक्त करीत असल्याबाबत त्यांचे पत्र जा. क्र. २०२०/जिबी/डेस्क.१/एमयुएन/कावि. ता, २८ जुन २०२० अन्वये घोषित केले. तसेच पदभार देण्यासंदर्भात प्रधान सचिव यांचे मार्गदर्शन मागविले आहे.
आता इतके सगळे रामायण-महाभारत घडल्यानंतर माजलगांव नगरपरिषद नगराध्यक्षपद इतर कोणाकडे जाते की रिक्त राहते याबातब उत्सुकता आहे. दरम्यान, आ. प्रकाश सोळंके यांनी नगर परिषद बरखास्तीची मागणी केलेली आहे.