BARC Gang Rape: धक्कादायक! भाभा अणुसंशोधन केंद्राच्या क्वार्टरमध्ये विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार
Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (BARC) क्वॉर्टरमधील फ्लॅटमध्ये एका 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (BARC Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. सदर घटना मंबईतील चेंबूर परिसरात घडली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 376 (ड) (सामूहिक बलात्कार), 328 (विषाने दुखापत करणे), 34 (सामान्य हेतू) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीएआरसी ही एक नामांकीत संस्था म्हणून ओळखली जाते. अशा संस्थेच्या आवारात घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, नामांकीत आणि अत्यंत सुरक्षीत समजल्या जाणाऱ्या संस्थेतही महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पीडितेचे वडील बीएआरसी कर्मचारी

पीडित मुलही ही विद्यार्थीनी आहे. ती वाणिज्य शाखेत शिकते. ती आल्या आई आणि बहिणीसोबत पालघर जिल्ह्यात राहते. मात्र, तिचे वडील बीएआरसी (BARC) मध्ये कामाला आहेत. वडिलांना भेटण्यासाठी म्हणून ती मुंबईला आली होती. बीएआरसीच्या काही कर्मचाऱ्यांना मा म्युनिसिपल हॉस्पिटलच्या समोर असलेल्या कॉम्प्लेक्समधील एका इमारतीत फ्लॅट देण्यात आले आहेत. यापैकीच एका फ्लॅटमध्ये तिचे वडील राहात असत. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, या ठिकाणीच ती तिच्या वडिलांना भेटण्यास आली होती. दरम्यान, तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला.

आरोपी बीएआरसी कर्मचाऱ्याचा मुलगा

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात पुढे आलेली माहित अशी की, दोन आरोपींपैकी अजित कुमार यादव (वय-26 वर्षे) पीडितेला ओळखत होता. अजित कुमार हा हा BARC कर्मचार्‍यांचा मुलगा आहे. तो पीडितेच्या घराजवळच राहात होता. अजितचे आई-वडील एका रात्रीसाठी बाहेर गेले होते. त्यामुळे तो घरात एकटाच होता. त्याचा फायदा घेत त्याने त्याचा मित्र प्रभाकर यादव (वय- 30 वर्षे) याला घरी बोलावून घेतले. प्रभाकर हा गवंडी येथे राहतो.

शीतपेयातून दिले गुंगीचे औषध

दरम्यान, पीडिता स्वयंपाचे साहित्य घेण्यासाठी अजित याच्या घरी गेली होती. या वेळी अजित यादव आणि प्रभाकर यादव या दोघांनी मिळून तिला शीतपेयाची (कोल्ड ड्रिंक) बाटली दिली. शीतपेयाच्या बाटलीतील ड्रिंक प्यायल्याने पुढच्या काहीच मीनिटांमध्ये तिचे भान हरपले. ती बेशुद्ध झाली. त्याचाच फायदा घेत दोघांनीही तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याचे, पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, साधारण साडेबाराच्या सुमारास मुलगी शुद्धीवर आली असता तिला घडला प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिने आपल्या फ्लॅटकडे धाव घेतली. तसेच, तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती तिने आपल्या जवळच्या लोकांना दिली.

एक्स पोस्ट

आरोपींना अटक

पीडितेने तिच्यासोबत घडल्या प्रकाराबद्दल पोलिसांत जाऊन 16 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 376 (ड) (सामूहिक बलात्कार), 328 (विषाने दुखापत करणे), 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच दिवशी आरोपींना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपींच्या घरातून स्पाइक केलेल्या कोल्ड्रिंकचे नमुनेही गोळा केले आहेत. जे सध्या फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.