पुण्यातील (Pune) बारामती येथे एका वडिलांनी आपल्या 9 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मुलगा अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनी स्वतःच्या 9 वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केला. बारामतीजवळ होळ गावात मंगळवार, 14 जानेवारी रोजी ही घटना घडली. पियुष विजय भंडलकर असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी मुलगा अभ्यास करत नसल्याने वडील त्याला ओरडले होते. घरातील इतर सदस्यांच्या उपस्थितीमध्ये दोघांत भांडण झाले होते. याच भांडणामध्ये आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी आपल्या मुलाला भिंतीवर आपटले व नंतर त्याचा गळा आवळला.
यानंतर कुटुंबीयांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले. तिथे मुलगा चक्कर येऊन पडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर पियुषचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले. मात्र, वडील विजय, काका संतोष आणि आजी शालन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता पियुषचे प्रेत गावी नेले. मुलाच्या मृत्यूविषयी कोणालाही कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी केली.
परंतु पोलिसांना याची माहिती मिळाली व त्यानंतर त्यांनी या तिघांचा डाव हाणून पाडला. याबाबत पोलिसांनी वडील विजय गणेश भंडलकर, शालन विजय भंडलकर, आणि काका संतोष सोमनाथ भंडलकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. प्राथमिक पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण श्वास गुदमरणे हे स्पष्ट झाले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. यासह मुलाच्या वडिलांनी मुलाचे डोके भिंतीवर आपटून त्याचा गळा दाबल्याचे कबूल केले. (हेही वाचा: Raigad Shocker: पेणमध्ये ड्रग्जच्या वादातून 14 वर्षीय वर्गमित्राची हत्या; मृतदेह झुडुपात फेकला)
पोलिसांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी काही घरगुती कारणांमुळे मुलाची आई त्याच्या वडिलांपासून वेगळी झाली होती आणि तो त्याच्या वडिलांसोबत होळ येथे राहत होता. मंगळवारी दुपारी मुलाने अभ्यास न केल्याबद्दल वडिलांनी त्याला रागे भरले. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. या वादामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी मुलाची हत्या केली. काही गावकऱ्यांनी याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांना माहिती दिली होती.