
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची सौम्य लक्षणे आहेत. त्यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप आला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ते दिवाळी निमित्त आयोजित कौटुंबीक आणि इतर काही सोहळ्यांना उपस्थित राहिले नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. शरद पवार हे दिवाळी निमित्त प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
बारामती येथील गोविंदबाग येथे शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करतात. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येतात. या वेळी शरद पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात. पवार यांनी यंदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांच्या अनुपस्थितीतीबाबत विचारले असता शरद पवारांनी सांगितलेकी, अजित पवार यांच्या घरी काम करणारे दोन नोकर आणि आणखी काही लोकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे वैद्यकीय अहवालातून पुढे आले आहे. त्यामुळे आजच्या कौटुंबीक कार्यक्रमासाठी घरातील सर्व लोक उपस्थित असताना धोका टाळण्यासाठीच आम्ही सर्वांनी अजित पवार यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला असल्याचे पवार यानी म्हटले. (हेही वाचा, IT Raids: 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोणतीही संपत्ती आयकर विभागाने ताब्यात घेतली नाही, माध्यमांनी चुकीचे वृत्त दिले'; NCP ने केले स्पष्ट)
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार व समस्त पवार कुटुंबिय दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी बारामती आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांना भेटत असतात. मात्र, यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम डॉ. अप्पासाहेब पवार ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला. यंदाच्या वर्षी भेटीसाठी येताना कोणीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नयेत असे आवाहन करण्यात आले होते.
दिवाळीनिमित्त शुभेच्छा आणि भेट देण्यासाठी बारामती आणि राज्यभरातून लोक शरद पवार यांच्या निवासस्थानी येतात. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह खासदार, आमदार, मंत्रीमंडळातील सदस्य, पदाधिकारी यांच्यासह समाजाच्या विविध स्तरातील लोकांचा समावेश असतो.