समृद्धी महामार्गावर आता कुणी रील्स काढले तर थेट तुरुंगाचा रस्ता धरावा लागणार आहे. समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Mahamarg) प्रवास करत असाल किंवा प्रवासाचं नियोजन केलं असेल, तर त्यावर थांबून व्हिडीयो किंवा रिल्स बनवणं किंवा फोटो काढणे महागात पडू शकते. समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढणाऱ्यांना पोलिसांनी गंभीर इशारा दिला आहे. 500 रुपयांच्या दंडासोबत 1 महिन्यांच्या कारावासाचा इशारा महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर काही तरुण फोटो, रील काढण्यासाठी वाहतुकीस अडथळा आणत असल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दौलताबाद रोडवरील समृद्धी महामार्गावरील पुलावर चढून फोटो आणि रील काढत आहेत. 80 ते 120 किमीच्या वेगानं जाणाऱ्या वाहनांना हात दाखवून वाहतुकीस अडथळा आणत होते. हे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर महामार्ग पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कलम 341 नुसार एक महिना कारावास किंवा 500 रुपये दंड तसेच कलम 283 नुसार सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला धोका किंवा इजा होईल असे कृत्य केल्यास दोनशे रुपये दंड ठोठावण्यात येईल.
समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. हजारावर अपघात होऊनही आणि दीडशेच्यावर जीव जाऊनही प्रशासनानं कठोर पावलं उचललेली नव्हती. पण आता प्रशासन सतर्क झालं असून नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.