Security heightened near Aurangzeb’s Tomb in Chhatrapati Sambhajinagar | X @ANI

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मध्ये असलेली मुघल बादशाह औरंगजेब ची कबर (Aurangzeb’s Tomb) हटवण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. विश्व हिंदु परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि बजरंग दल (Bajrang Dal) यांनी जर सरकारने औरंगजेबची कबर हटवली नाही तर 'कारसेवा' (Karseva) करून ही हटवली जाईल असा इशारा दिला आहे. दरम्यान राज्यात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या इशार्‍यानंतर छत्रपती संभाजी नगर भागामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.औरंगजेब च्या कबरी जवळ देखील सुरक्षा चोख ठेवण्यात आली आहे.

बजरंग दलाचा इशारा काय?

छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीची पूजा केली जात आहे. संभाजीं राजेंच्या खुनीची कबर बांधली जाते आणि आता अशा कबरांची पूजा केली जाते. तेव्हा समाजही त्याच पद्धतीने विकसित होत होतो. आपण त्यावेळी असहाय्य होतो, पण आता विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल ती हटवण्याची मागणी करत आहेत. असे बजरंग दलाचे सदस्य नितीन महाजन यांनी सांगितलं आहे. दरम्यान सरकारने ती हटवली नाही तर बाबरी मशिदी सारखी इथेही कारसेवा करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कार सेवा म्हणजे काय?

कारसेवा हा संस्कृत शब्द आहे. यामध्ये कार - कर म्हणजे हात

सेवा म्हणजे सेवक करत असलेले काम. निस्वार्थीपणे सेवा करणारा हा कारसेवक म्हटला जातो. कारसेवा चा उल्लेख शीख धर्मगुरूंनी त्यांच्या लेखांमध्येही केला आहे. अमृतसर मध्ये सुवर्णमंदिर अशा कारसेवकांच्या कार्यातून झाले. बाबरी मशिद पाडून अयोद्धेचं राम मंदिर उभारण्यासाठीही अनेक कारसेवक अयोद्धेला पोहचले होते.  लाखो स्वयंसेवकांनी बाबरीवर चढून ती पाडली होती.  याच धर्तीवर औरंगजेबाची कबर हटवण्यासाठीही मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने अनेकजण छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल होऊ शकतात असा इशारा देण्यात आला आहे.

बजरंग दलाच्या इशारानुसार, 17 मार्च रोजी ते सरकारला कारवाई करण्यासाठी औपचारिकपणे आग्रह करतील. "जर त्यांनी स्वतःहून कबर हटवली तर आम्ही त्यांचे स्वागत करू, परंतु जर तसे झाले नाही तर विहिंप आणि बजरंग दल रस्त्यावर उतरतील आणि मोठे आंदोलन करतील," असे महाजन म्हणाले आहेत. शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

IANS च्या वृत्तानुसार, औरंगजेबाच्या कबरीवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे, एसआरपीएफ आणि स्थानिक पोलिस तैनात आहेत. सध्या कसून तपासणी केल्यानंतरच पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे आणि बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.