मिलिंद देवरा यांच्यानंतर आता कॉंग्रेस मधून बाबा सिद्धिकी (Baba Siddique)
आणि त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) देखील पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सिद्दीकी पिता पुत्र आता एनसीपी मध्ये अजित पवार यांच्या गटा मध्ये प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. झीशान हे मुंबईतील युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि बांद्राचे आमदार आहेत. तर बाबा सिद्दिकी माजी आमदार आहेत.
मीडीया रीपोर्ट्स नुसार, सिद्दिकी पिता पुत्र 10 फेब्रुवारीच्या दरम्यान अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. झीशान सिद्दिकी युवक काँग्रेस अध्यक्ष पदाचा आणि त्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार गटात जाऊ शकतात. 10 फेब्रुवारीला वांद्रे येथे 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याने सिद्दिकींची नाराजी होती. त्यातच झीशान यांचा मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या निवासस्थान असलेल्या भागात येत असल्याने ठाकरेंच्या सरकारच्या काळातही ठाकरे गटातील काही नेत्यांची लुडबूड होत असल्यानं ते नाराज होते. त्यामुळे सिद्दिकी पितापुत्रांनी अजित पवारांशी संपर्क सुरू केला असल्याची चर्चा आहे. नक्की वाचा: Why Milind Deora Quits Congress: मिलिंद देवरा यांनी काँग्रेससोबतचे 55 वर्षे जुने नाते का तोडले? काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर .
मागील दोन वर्षात महा विकास आघाडी मधील शिवसेना आणि एनसीपी या पक्षांत मोठी फूट पडली आणि राज्याच्या सत्तेमध्ये मोठे बदल झालेले पहायला मिळाले आता कॉंग्रेस पक्ष देखील महाराष्ट्रात फूटीच्या उंबरठ्यावर उभा आहे का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. देशपातळीवर इंडिया आघाडीला देखील सुरूंग लागला आहे. पण राज्यात अद्याप महाविकास आघाडीत कॉंग्रेस एकत्र आहे. सत्ता जागा वाटपावरून कुरबुरीच्या चर्चा आहेत. पण यामधून वाटाघाटी केल्या जातील असं महाविकास आघाडीकडून सांगितलं जात आहे.