Auto-Taxi Fare: मुंबईत 1 ऑक्टोबरपासून ऑटो आणि टॅक्सीचा प्रवास महागणार, जाणून घ्या किती प्रमाणात झाली भाडेवाढ ?
मुंबईत टॅक्सी-ऑटोरिक्षा (संग्रहित संपादित प्रतिमा)

ऑटो आणि टॅक्सीचा प्रवास (Auto and taxi travel) आता महाग होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार आहे. सीएनजीच्या (CNG) दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऑटो आणि टॅक्सी युनियनच्या मागण्या अखेर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मान्य केल्या आहेत.  भाडेवाढीच्या या निर्णयाला मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.  म्हणजेच, जर तुम्ही मुंबईत ऑटोमध्ये बसलात, तर तुमच्यासाठीचे मीटर आता 21 रुपयांऐवजी किमान 23 रुपयांनी पडेल. त्याचप्रमाणे टॅक्सीमध्ये बसण्यासाठी आता किमान भाडे 25 ऐवजी 28 रुपये असेल. हे वाढलेले भाडे 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

गेल्या काही दिवसांत सीएनजीचा दर 49 रुपयांवरून 80 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनेने भाडेवाढ करण्याची परवानगी मागितली होती. यापूर्वी मार्च 2021 मध्ये ऑटो आणि टॅक्सी भाडे वाढवण्यात आले होते. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ऑटो आणि टॅक्सी चालक व मालक संघटना भाडेवाढीची मागणी करत आहे. हेही वाचा Gujrat मधून Sanjay Gandhi National Park मध्ये 2 सिंह आणणार, महाराष्ट्र वन विभागाची माहिती

मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून संपावर जाण्याचा इशाराही संघटनेने दिला होता. तत्पूर्वी शुक्रवारी उद्योगमंत्री उदय सामंत आणि ऑटो-टॅक्सी चालकांच्या संघटनेत बैठक झाली. या बैठकीत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.  उद्योगमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ऑटो-टॅक्सी असोसिएशनच्या सदस्यांनी बोलून दाखवले की, सीएनजीच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे ऑटो आणि टॅक्सी व्यवसाय कोलमडत आहे.

असोसिएशनने भाडेवाढीसह एकूण 18 मागण्या मांडल्या.यापैकी 16 मागण्यांवर सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी बैठकीत सांगितले.  या आश्वासनानंतर ऑटो-टॅक्सी युनियननेही संपाचा इशारा मागे घेण्याचे सांगितले आहे.आॅटो आणि टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी प्रकल्प उभारण्याचीही चर्चा होती.त्यासाठी सरकारने 100 दिवसांची मुदत दिली आहे.