Renuka Gondhali Sends 101 RS Help To CM Relief Fund (Photo Credits : Twitter)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या वाढदिवशी विनाकारण खर्च करण्यापेक्षा तीच रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (CM Relief Fund) देण्याची सूचना केली होती. यानुसार अनेक कार्यकर्त्यांनी तसेच नेते मंडळींनी पुढाकार घेऊन त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून निधीत योगदान दिले. नवनिर्वाचित खास नवनीत राणा (Navneet Rana)  यांनी सुद्धा काल आपला खासदारकीचा पहिला पगार निधीत समर्पित करणार असल्याचे सांगितले. हे सर्व सुरु असतानाच काल मदत निधीसाठी एका पत्रासोबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एक खास भेट देखील पोहचली होती. औरंगाबादच्या (Aurangabad) रेणुका गोंधळी (Renuka Gondhali)  नामक एका मजूरी करणाऱ्या महिलेने फडणवीस यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून आपली एका दिवसाची कमाई म्हणजेच 101 रुपये निधीसाठी देऊ केले आहेत. फडणवीस यांनी स्वतः या महिलेचे पत्र आणि सोबतच एक व्हिडीओ आपली ट्विटर वरून शेअर केला आहे.

रेणुका यांनी आपल्या पत्रात म्हंटल्याप्रमाणे, काही महिन्यांपूर्वी त्यांचा भाचा वेदांत हा काहीश्या आजराने ग्रासला होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही सर्व नातेवाईकांनी एकत्र येऊन आपली सर्व जमापुंजी त्याच्या उपचारासाठी गोळा केली होती, मात्र तरीही खर्चाचे गणित जुळत नव्हते, अशात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फोनवरून एक साधा मॅसेज केला होता, पण त्याची तातडीने दखल घेत वेदांताच्या उपचारासाठी 1.90 लाखाची आर्थिक मदत पाठवून देण्यात आली,यामुळे या चिमुकल्याला एक नवे जीवन दानच मिळाले होते. या उपकाराची परतफेड म्हणून आपण आपली एका दिवसाची पूर्ण कमाई मुख्यमंत्री सहायता निधीत पाठवत आहोत असे रेणुका यांनी पत्राच्या शेवटी लिहिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट

(हे ही वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवनीत राणा यांनी दिले खास गिफ्ट, खासदारकीचा पहिला पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार)

दरम्यान, हे ट्विट शेअर करताना फडणवीस यांनी रेणुका यांच्या पत्राने आणि योगदानाने आपण भारावून गेलो आहोत असे म्हंटले आहे. केवळ एक मदत लक्षात ठेवून उपकाराची परतफेड करण्यासाठी रेणुका यांनी आपल्या मजुरीच्या मोलाचे दान करणे ही हृदयस्पर्शी बाब आहे.