Aurangabad Cyber Crime: अतिवृष्टी नुकसान भरपाई घेता आहात? शेतकऱ्यांनो सावधान! सायबर गुन्हेगार नजर ठेऊन आहेत, काळजी घ्या
Cyber Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) अनेकांना ऑनलाईन गंडा (Online Fraud) घातल्याचे प्रकार आजवर अनेकदा उघडकीस आले आहेत. आता या सायबर गुन्हेगांनी आपली नजर शेतकऱ्यांकडे वळवली आहे. हे गुन्हेगार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून सरकारकडून मिळणारी रक्कम वाढवून देण्याचे आमिष शेतकऱ्यांना दाखवतात. वारंवार संपर्क साधून शेतकऱ्यांशी ओळख वाढवतात. त्यातून शेतकऱ्यांची व्यक्तिगत माहिती मिळवत आधार, पॅन क्रमांक, बँकेचा खाते क्रमांक, एटीएम पीन, मोबाईल क्रमांक असा तपशिल मिळवतात. सर्व तपशील मिळाला की त्याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करतात. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अशी प्रकरणे पुढे आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. प्रामुख्याने असे प्रकार औरंगाबाद (Aurangabad Cyber Crime) जिल्ह्यात घडले आहेत.

शेतकऱ्यांनी आपला व्यक्तिगत तपशील तसेच, आपल्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती, कोड, क्रमांक कोणालाही सांगू, देऊ अथवा शेअर करु नयेत असे अवाहन औरंगाबाद सायबर क्राईम विभागाने केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Mumbai Cyber Crime Case: मुंबईतील डॉक्टरला 2.99 लाखांचा ऑनलाईन गंडा, आरोपीचा शोध सुरू)

चक्रिवादळ, अतिवृष्टी, महापूर यांमुळे शेतकरी आगोदर हवालदिल झाला आहे. सरकारी पातळवीरुन त्याला मदत करण्यात येत आहे. मात्र, तिही अगदीच तुटपूंजी आहे. अशा स्थितीत शेतकरी कसाबसा मार्ग काढत आहे. सरकारी मदत वेळेवर मिळाल्यास त्या रकमेतून रब्बीची पेरणी करुन खत आणि बियाणं खरेदी करण्याचा अनेक शेतकऱ्यांचा विचार आहे. अनेक शेतकऱ्यांना शेतीच्या इतरही कामांसाठी हे पैसे कामी येऊ शकतात. मात्र हे सायबर भामटे याच पैशांवर नजर ठेऊन आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

अनेकदा हे सायबर गुन्हेगार शेतकऱ्यांना आमिश दाखवतात की, त्यांची पीक विमा, नुकसनाभरपाई रक्कम वाढवून दिली जाईल. काही लोकांना ते कवच योजनेबाबतही माहिती देतात. मात्र, या लोकांच्या जाळ्यात न येणेच केव्हाही चांगले. नाहीतर आपल्या पैशांवर ऑनलाईन डल्ला कधी पडेल हे सांगता नाही येत. तेव्हा शेतकऱ्यांना सावधान.