राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Legislative Budget session 2020) आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे सभागृहात विरोधक आजही आक्रमक होताना दिसले. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना, तसेच शेतकरी कर्जमाफी आदी मुद्द्यांवरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाजात वारंवार अडथळा आल्याने आणि कामकाज करणे अशक्य होऊन बसल्याने सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्याचा निर्णय विधासभा अध्यक्ष नाना पटोले ( Assembly Speaker Nana Patole) यांनी घेतला.
सभागृह सरु होताच विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दाखल केला. शेतकरी कर्जमाफी आणि राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार आदींवरुन विरोधक आक्रमक झाले होते. या वेळी 'एकच नारा सातबारा कोरा' अशा घोषणाही विरोधकांनी दिल्या.
दरम्यान, मी आपल्याला बोलण्याची संधी देतो. आपण मला सहकार्य करा, असा विश्वास सभागृह अध्यक्ष नाना पटोले यांनी देऊनही विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे विरोधक वारंवार घोषणाबाजी करत होते. सभागृहातील गोंधळ एका क्षणाला तर इतका टीपेला गेला की, सभागृहाचे कामकाज करणे अशक्य होऊन बसले. त्यामुळे सभागृह तहकूब करावे लागेल. (हेही वाचा, Maharashtra Budget Session 2020: सोमवारपासून सुरू होणार महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन)
दरमयान, विरोधकांनी आजही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून (24 फेब्रुवारी 2020) सुरु झाले. पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोनल सुरु केले. पहिल्याच दिवसाचा कित्ता दुसऱ्या दिवशीही गिरवत विरोधकांनी सभागृहात दुसऱ्या दिवशीही गोंधळ घातला.