पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Assembly Election Results 2022) कोणत्या दिशेने जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. या निकालावर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या निकालाने दाखवून दिले की, जनता सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाऊ इच्छिते. अपवाद फक्त पंजाबचा. दरम्यान, पंजाबच्या निवडणूक निकालाने हेही दाखवून दिले की, निवडणूक जर जनतेने हातात घेतली तर निकाल अनपेक्षीत लागू शकतात.
पंजाब राज्यातील निवडणुकीचा निकाल भाजपसाठी अनुकूल नाही. परंतू, काँग्रेस पक्षाला मात्र धक्का देणारा आहे. पंजाबमध्ये आज चित्र अत्यंत वेगळे पाहायला मिळते आहे. पंजाब वगळता इतर ठिकाणी मात्र भाजपला सत्ता राखण्यात यश मिळते आहे असे दिसते. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने दोन वेळा चांगले यश संपादन केले. त्याचा परिणाम पंजाबमध्ये पाहायला मिळाला. मात्र, पंजाब वगळता इतर राज्यांनी मात्र सत्ताधारी पक्षालाच आपले जनमत देण्याचा विचार केल्याचे दिसते, असेही शरद पवार म्हणाले. (हेही वाचा, Goa Assembly Election Results 2022: गोव्यात भाजप बहुमतात, अपक्षांनी दर्शवला पाठींबा; विजयासाठी 'हे' मुद्दे ठरले प्रभावी)
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. तर उत्तर प्रदेशमध्येही भाजप सत्ता कायम राखताना दिसतो आहे. उर्वरीत उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही भाजपने मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. दरम्यान, अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. प्रदीर्घ काळ प्रचार आणि विविध टप्प्यांमध्ये हे मतदान पार पडले. या मतदानाबाबत निर्माण झालेली उत्सुकता आज संपणार आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणी पोस्टल बॅलेट मतांपासून सुरु झालेल्या मतमोजणीनंतर आता ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु आहे. उत्तर प्रदेशसाठी 403, पंजाब- 117, उत्तराखंड- 70 आणि गोव्यासाठी 40 जागांसाठी या ठिकाणी मतदान झाले. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद केले. आज या उमेदवारांबाबत जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट होणार आहे.