Ashish Shelar On Narayan Rane Arrest: नारायण राणे अटक प्रकरणाची सीबीआय चौकशी का करु नये? आशीष शेलार यांचा सवाल
Ashish Shelar | (File Photo)

नारायण राणे (Narayan Rane) यांना झालेली अटक ही राजकीय सूडापोटी केलेली कारवाई आहे. त्यामुळे ती अटक बेकायदेशीर आहे. त्यामुळे या अटकेच्या कारवाईची सीबीआय चौकशी का करु नये? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केला आहे. ते मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या अटकेमागे परीवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) हेच आहेत. अनिल परब गृहमंत्री नाहीत. तरीही ते गृहमंत्रालयात हस्तक्षेप करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या आधी अनिल परब हे गृहमंत्रालयात हस्तक्षेप करत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राणे यांची अटक हे एक कारस्थान होते, असेही आशीष शेलार यांनी म्हटले.

देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव आहे की हीरक महोत्सव हा फरक मुख्यमंत्र्यांना कळत नाही. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या अज्ञानावर पांघरुन घालण्यासाठी हे सरकार नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासारखे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा आता एक मोहीम हाती घेणार आहे. देशाच्या अमृत महोत्सवाबद्द मुख्यमंत्र्यांना आठवण राहावी म्हणून महाराष्ट्रातून भाजप कार्यकर्ते 75 हजार पत्रं मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांना आठवण राहीली नाही तर गांधीगिरीच्या मार्गाने फुले पाठवून नव्हे तर फुलांचे काटे पाठवून आठवण करुन देईल, असेही आशिष शेलार या वेळी म्हणाले.

दरम्यान, राज्यात शिवसेनेची झुंडशाही सुरु आहे. शिवसेनेची झुंडशाही पाहून तिकडे तालीबानही आत्महत्या करेन असेही आशिष शेलार म्हणाले. दरम्यान, आशीष शेलार यांना पत्रकारांनी विविध राष्ट्रीय मुद्द्यांवरुप प्रश्न विचारण्यात आले असता राष्ट्रीय मुद्द्यांवर आमचे राष्ट्रीय नेते उत्तर देतील असे सांगत बोलणे टाळले.