![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/04/8da8ca5b-22d7-4234-b20d-02b9c0deb189-380x214.jpg)
मुंबईमध्ये वाढत्या भटक्या मांजरांपासून मुक्ती मिळावी म्हणून चक्क मांजरांच्या नसबंदीचा (Cat Sterilisation) उपक्रम राबवला जाणार आहे. या मोहिमेला भारतीय पशुकल्याण मंडळाने मंजुरी दिली असून, 1 एप्रिलपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. या उपक्रमासाठी पालिकेकडून तब्बल 1 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर नसबंदी उपक्रमाअंतर्गत मांजर पकडून आणणे, नसबंदीसाठी दाखल करणे व सोडणे यासाठी एकूण 1200 रुपये खर्च येणार आहे. यामध्ये भटक्या मांजरांसह पाळीव मांजरांची नसबंदी करता येणार आहे. यामुळे मांजरांच्या वाढत्या प्रजननाला आळा बसणार असून रोगराई व दुर्गंधी थांबण्यास मदत होणार आहे.
मुंबईमध्ये सध्या भटक्या मांजरांचा फार उपद्रव होत आहे. कुत्र्यांपेक्षा मांजरींचे प्रजनन अधिक होताना दिसून येत आहे. भटकी मांजर ही एका वेळेस सरासरी 2 ते 5 पिल्लांना जन्म देते. इतक्या मोठ्या संख्येमुळे शहरात रोगराई व दुर्गंधीचे प्रमाण फार वाढले आहे. नागरिकांकडून वेळोवेळी याबाबत तक्रारी येत होत्या, त्यामुळे नगरसेवकांकडून मांजरांचीही नसबंदी करावी अशी मागणी करण्यात येत होती. शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी मांजरांची नसबंदी करावी अशी ठरावाची सूचनाही मांडली होती. (हेही वाचा: नसबंदीसाठी घाबरणाऱ्या पुरुषांसाठी खुशखबर; आता एकाच इंजेक्शनमुळे 13 वर्षांची चिंता मिटणार)
सध्या काही सामाजिक संस्थांमार्फत दवाखान्यात अशा प्रकारची नसबंदी होत आहे, मात्र आता पालिकेकडून हा उपक्रम राबवला जाणार असल्याने एकूण आकडा ध्यानात येईल. मुंबईत डब्ल्यूएसटी, वेल्फेअर ऑफ स्टे डॉग, बॉम्बे एसपीसीए, आयडिया इंडिपेंडन्स ऑफ ऍनिमल्स, ‘अहिंसा’, मालाड, ‘उत्कर्ष’ सामाजिक संस्था अशा ठिकाणी मांजरांची नसबंदी केली जाणार आहे. याआधी मुंबईत भटकी कुत्री व कबुतरांची उत्पत्ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न झाला होला.