Aryan Khan Drugs Case: किरण गोसावी- एक नाव बारा भानगडी; पुणे पोलिसांचा तपास सुरु
सचिन पाटील नावाने वावरायचा किरण गोसावी | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आर्यन खान ड्रग्ज (Aryan Khan Drugs Case) प्रकरणात एनसीबीचा (NCB) पंच असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) याला ताब्यात घेतल्यानंतर बरेच खुलासे होऊ लागले आहेत. पुणे पोलिसांनी त्याला लखनऊ येथून अटक केली आहे. किरण गोसावी हा पुणे पोलिसांच्या दप्तरी गुन्हा नोंद असलेला आरोपी आहे. 2018 मधील एका फसवणूक प्रकरणात तो पुणे पोलिसांना हवा होता. तो ताब्यात आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत अनेक माहिती आणि खुलासे होऊ लागले आहेत. पुणे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. किरण जेव्हा फरार होता त्या कालात तो सचिन पाटील (Sachin Patil) नावाने वावरत होता.

किरण गोसावी याच्यावर पुणे येथील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होतेच. पण तो गायब होता. अखेर तो दिसला ते थेट एनसीबीने मुंबई क्रुजवर छापा मारुन आर्यन खान याला ताब्यात घेतानाच. एनसीबीने आर्यन खान याला ताब्यात घेतला तेव्हा तो आर्यन खान याच्या सातत्याने सोबत होता. तसेच, त्याने आर्यन खान याच्यासोबत सेल्पीही काढला होता. त्यामुळे तो जोरदार चर्चेत आला होता. याशिवाय आर्यन खान याला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याप्रमाणे खेचून घेऊन जात असतानाही तो कॅमेऱ्यात कैद झाला होता. (हेही वाचा, Aryan Khan Drugs Case: एनसीबी पंच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातीस मोठी घडामोड)

सचिन पाटील नावाने वावर

फरार असलेला किरण गोसावी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सचिन पाटील नावाने वावरत होता. देशातील विविध राज्यांमध्ये तो सचिन पाटील नावानेच वावरत होता. तो एका हॉटेलमध्ये राहात असे. तसेच, तो 'स्टॉप क्राईम ऑर्गनायझेशन' नावाच्या एका संस्थेचा सदस्य असल्याचेही तो सांगतो. या शिवाय त्याने आपण एका गुप्तहेर संस्थेचा सदस्य असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. तो इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात निर्यातीचे काम करत असल्याची माहिती गोसावी याने पोलिसांना दिली आहे. पोलीस पुढील तपासही करत आहेत.

किरण याला अटक होण्याचे कारण?

चिन्मय देशमुख हा कसबा पेठ पुणे येथील तरुण. हा तरुण नोकरीच्या शोधात होता. दरम्यान, किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी या दोघांशी चिन्मय याची ऑनलाईन माध्यमातून ओळख झाली. किरण आणि शेरबानो यांनी या दोघांना मलेशियात चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे अमिष दाखवले. त्याच्याकडून वेळेवेळी पैसे काढले. चिन्मयने या दोघांना जवळपास तीन लाख रुपयांची रक्कम दिली. मात्र, पुढे नोकरीचे नावही काढले नाही. त्यामुळे किरण गोसावी याने आपली फसवणूक केल्याची तक्रार चिन्मय देशमुख याने पोणे पोलिसांत केली.

शेरबानो कुरेशी हिला मुंबईतून अटक

तक्रार दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांना चौकशीसाठी हजर राहा असे आदेश दिले. मात्र, अनेकदा आदेश देऊनही हे दोघे चौकशीला हजर राहिले नाहीत. अखेर पोलिसांनी या दोघांना फरार घोषीत केले. दोन्ही आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवली. दरम्यान, किरण गोसावीची मैत्रीण शेरबानो कुरेशी हिला मुंबईतून अटक करण्यात आली. पोलिसांनी किरण गोसावी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. अखेर पुणे पोलिसांनीच त्याला उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथून बेड्या ठोकल्या. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली होती.