सरत्या वर्षाचे अवघे तीन दिवस बाकी आहेत. 31 तारखेला नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज होतील. अशावेळी तुम्ही मुंबईमध्ये असाल आणि रात्री उशिरा बाहेर राहून परत घरी कसे जायचे याची काळजी असेल तर, आता निर्धास्त राहा. 31 तारखेला रात्री मध्य रेल्वेने 4 आणि पश्चिम रेल्वेने 8 विशेष रात्रकालीन लोकल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टनिमित्त जर का तुम्ही रात्री बाहेर राहणार असला तर, घरी परतण्यासाठी तुम्ही या लोकलचा फायदा घेऊ शकता.
थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन हे जवळजवळ सर्व शहरांत होते. त्यात मुंबईसारख्या शहरात तर विचारू नका. दादर चौपाटी, गिरगाव, मरीन ड्राईव्ह, गेट वे आँफ इंडिया अशा अनेक ठिकाणी रात्रभर लोकांची वर्दळ असते. शहरातील मुख्य रस्ते गर्दीने गजबजलेले असतात. अशात घरी परत येण्याची पंचायत होऊन बसते. त्यात संधीचा फायदा घेऊन अँप बेस्ड टॅक्सी आपले दर वाढवण्याची शक्यता असते. या विशेष लोकल तुमच्या दिमतीला असणार आहेत.
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-कल्याण, कल्याण-सीएसएमटी, सीएसएमटी-पनवेल आणि पनवेल-सीएसएमटी अशा चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट-विरार मार्गावर 4 आणि विरार-चर्चगेट मार्गावर 4 अशा एकूण आठ लोकल धावणार आहेत.
असे असेल वेळापत्रक –
चर्चगेटवरून विरारकडे धावणाऱ्या लोकल – रात्री 1.15, 2, 2.30, 3.25
विरारवरून चर्चगेटकडे धावणाऱ्या लोकल – रात्री 12.15, 12.45, 1.40, 3.05
सीएसएमटीवरून कल्याणकडे धावणारी लोकल – रात्री 1.30
कल्याणवरून सीएसएमटीकडे धावणारी लोकल – रात्री 1.30
सीएसएमटीवरून पनवेलकडे धावणारी लोकल – रात्री 1.30
पनवेलवरून सीएसएमटीकडे धावणारी लोकल – रात्री 1.30