Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

Arnab Goswami in Maharashtra Police Custody: महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे. त्यामळे अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांना झालेल्या अटकेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध जोडू नये. ही कारवाई पूर्णपणे पोलिसांची आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील त्यामुळेच त्यांनी अटक केली असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. रिपब्लिक चॅनलचे सर्वेसर्वा अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रामध्ये कोणाचाही आवाज दाबला जात नाही. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात पत्रकारांना अधिक स्वातंत्र्य मिळते. परंतू, एखाद्या व्यक्तीविरोधात सबळ पुरावे असतील तर पोलीस संबंधित व्यक्तीला अटक करु शकतात. त्यामुळे कायदेशीर कारवाई असेल तर त्याला आपण आवाज दाबला असे म्हणू शकत नाही. खास करुन महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्यापासून कोणाचाही आवाज दाबला जात नाही, असेही संजय राऊत यांनी या वेळी म्हटले आहे.

पत्रकारीतेसाठी हा कोणत्याही प्रकारचा काळा दिवस नाही. आपण पत्रकार म्हणून आणि नागरिक म्हणूनही कायदा पाळायला हव्यात. योग्य त्या मर्यादांचे पालन करायला हवे. नाहीतर कायदाच आपल्याला सोडणार नाही. मग ती व्यक्ती पत्रकार असो, राजकीय नेता असो, सर्वसामान्य नागरिक असो वा इतर कोणीही असो, असेही संजय राऊत या वेळी म्हणाले.

रिपल्बिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 या दिवशी आत्महत्या केली होती. अलिबाग येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख होता. (हेही वाचा, Arnab Goswami in Maharashtra Police Custody: रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्नब गोस्वामी पनवेल पोलिसांच्या ताब्यात)

दरम्यान, पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रं अथवा कोर्टाचा आदेश, समन्स नसतानाही कारवाई करण्यात आली. तसेच या शिवाय पोलिसांकडून अर्नब गोस्वामी यांना जबरदस्ती करत, धक्काबुक्कीही करण्यात आली, असा दावा रिपब्लिक टिव्हीकडून करण्यात आला आहे.