आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्रात जास्तीत जास्त उमेदवार निवडूण आणायचे असेल तर आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर मोठी जबाबदारी द्यायला हवी. विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळविण्यासाठी खडसे यांना सक्रीय करण्यास पर्याय नाही, अशी मागणी पक्षाचे प्रदेश संघटक-सचिव अनिल महाजन () यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
ओबीसी-बहुजन नेते अशी ओळख असलेल्या अनिल महाजन यांनी आज प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी मुख्य सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे लेखी पत्र दिले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी प्रभावी करण्यासाठी एकनाथ खडसे सक्षम आहेत. पक्षाचे इतर नेते केवळ आपल्या मतदारसंघापुरता विचार करु शकतात पण खडसे हे संपूर्ण जळगाव आणि महाराष्ट्रात ताकद एकवटू शकतात. त्यामुळे खडसे यांना जिल्ह्यातील सर्व कार्यक्रमांना निमंत्रीत करावे, असे अवाहनही या पत्रात करण्यात आले आहे.
अनिल महाजन यांनी म्हटले की, जळगाव जिल्ह्यातून शरदचंद्र पवार गटाचे तुतारीचे आमदार जास्तीत-जास्त निवडून आणायचे असेल तर विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांच्याशिवाय पर्याय नाही. जिल्ह्यात एकनाथराव खडसे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्याचा मतदारांवर मोठा प्रभाव पडू शकतो. अनिल महाजन यांना ओबीसी नेते म्हणून ओळखले जाते. तसेच, ते एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जाते.