महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आज (28 डिसेंबर) 13 महिन्यांनंतर अखेर तुरूंगाबाहेर आले आहेत. 100 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्र्करणी ईडी आणि सीबीआय यांच्या ताब्यात असलेले अनिल देशमुख मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून बाहेर पडले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर मधून अधिवेशनातून अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हजर झाले होते. त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हजर होत्या. अनिल देशमुख आर्थर रोड जेलबाहेर येताच त्यांच्यावर एनसीपी कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली. अजित पवारांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
दरम्यान अजित पवार यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केल्यानंतर त्यांच्यासोबत मागील वर्षभरात काय झाले हे आता हळूहळू कळेल असं म्हटलं आहे. तर छगन भुजबळ यांनी पीएमएलए अॅक्ट बाबत पुन्हा विचार केला जावा असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी सत्यमेव जयते म्हणत कोणताही दोष नसल्याने अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला नाहक त्रास झाला. या वर्षभराची भरपाई कशी मिळणार? असा सवाल विचारला आहे. तर अनिल देशमुख यांनी आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला चूकीच्या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला असल्याचं म्हटलं आहे. तसेच 'परमबीर सिंग यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे ऐकण्यावर आधारित आहेत, त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत.'असेही अनिल देशमुखांनी मीडीयाशी बोलताना म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh is released from Arthur road jail in Mumbai. pic.twitter.com/a3OKktDrq8
— ANI (@ANI) December 28, 2022
अनिल देशमुख यांचे कुटुंब आज नागपूर मधून मुंबई मध्ये दाखल झाले आहे आणि त्यांनी अनिल देशमुख यांच्या सुटकेवर आनंद व्यक्त केला आहे. अनिल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि नागपूरात आनंद व्यक्त केला आहे. आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत एनसीपी कार्यकर्त्यांचा बाईक रॅलीचं देखील आयोजन केले आहे. पण त्याला पोलिस परवानगी देणार का? हे पहावं लागणार आहे.