Uddhav Thackeray | (Photo Credit: You Tube)

शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गट (Shinde Fraction) आणि उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Fraction) निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. अंधेरी पोट निवडणूकीमध्ये (Andheri East By Poll) त्यांच्यात पहिली लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान तत्पूर्वी निवडणूक आयोगाने या पोटनिवडणूकीसाठी दोन्ही पक्षांना 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' ही निशाणी वापरण्यास बंदी घातली आहे. ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव तर मशाल आणि ढाल तलवार हे पक्षचिन्ह दिले आहे. पण यावरून आता समता पक्षाने आक्षेप घेतला आहे. समता पक्षाचं 'मशाल' हे चिन्ह असल्याने निवडणूक आयोगाने शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाला फ्री यादी मधून अन्य कोणतेही चिन्ह द्यावं अशी मागणी केली आहे.

पहा ट्वीट

मीडीया रिपोर्ट्सनुसार, समता पक्ष 'मशाली' वर आक्षेप घेत निवडणूक आयोगात जाणार आहे. तसेच त्यांच्याकडून अंधेरी पोट निवडणूकीमध्ये आपला उमेदवार उतरवण्याची देखील चर्चा आहे. नक्की वाचा:  अंधेरी पोटनिवडणूकीसाठी 'मशाल' निवडणूक चिन्ह मिळताच शिवसैनिक पोहचले धगधगती मशाल घेऊन मातोश्री वर; उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मानले आभार .

एकीकडे पक्ष चिन्हावरून हा नवा पेच झालेला असताना उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी दिली जाणार्‍या ऋतुजा लटके यांचा प्रशासकीय सेवेतील राजीनामा अद्याप मान्य न झाल्याने त्यांची कोंडी होत आहे. ऋतुजा लटके या महापालिकेच्या कार्यालयामध्ये कार्यरत होत्या. त्याच्या पतीच्या निधनानंतर आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी रमेश लटके यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. पण त्यांनी महिन्याभरापूर्वी राजीनामा देऊनही तो मंजूर न झाल्याने त्या निवडणूकीचा अर्ज भरू शकत नाहीत. या कोंडीमधूनही उद्धव ठाकरे कसा मार्ग काढतात हे पहावं लागणार आहे.

अंधेरी पोट निवडणूक 3 नोव्हेंबर दिवशी आहे. तर 6 नोव्हेंबरला या निवडणूकीचा निकाल आहे. शिंदे आणि ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.