अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly Bypoll) 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) तर भारतीय जनता पक्षाकडून (BJP) मुरजी पटेल (Murji Patel) रिंगणात आहेत. पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याबाबत भाजपवर दबाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एका बाजुला पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवताना केलेले राजकारण आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या राजकारणातील काही संकेत यावरुन भाजपची गोची झाली आहे. त्यामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिलेला उमेदवार कायम ठेवायचा की मागे घ्यायचा याबाबत भाजपमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी (16 ऑक्टोबर) रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीतही लढायचं की माघार घ्यायची? हाच सूर होता. दरम्यान, या बैठकीत निर्णयाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे भाजप काय निर्णय घेतो याबाबत उत्सुकता आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिलेला उमेदवार मागे घ्यावा आणि ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील संकेत पाळले जातील तसेच दिवंगत रमेश लटके यांच्या आत्म्यालाही शांती मिळेल, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रच सोशल मीडियावर अपलोड केले. हे पत्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ऋतुजा लटके यांना विधानसभेवर बिनविरोध पाटवून राज्याच्या राजकारणातील संकेतांचे पालन करावे. मात्र, प्रत्येक पक्षाला आपापला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटातील प्रताप सरनाईक यांचेही एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रातही त्यांनी ऋतुजा लटके यांना विधानसभेवर बिनविरोध पाठवावे, असे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अंधेरीची जागा भाजप जिंकेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नेत्यांनी व्यक्त केला.
अंधेरीच्या जागेवरुन भाजपला अगदी जपून पावले टाकावी लागतील. निर्णयही सर्व बाजूंनी विचार करुनच घ्यावा लागेल. जर उमेदवार मागे घ्यायचा तर ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन झालेले रामायण आणि या आधी पोटनिवडणुकीत उमेदवार उतरविण्यात आले आहे त्याचे काय करायचे हा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला जनमत फिरले आणि ऋतुजा लटके निवडून आल्या तर आगामी मुंबई महापालिकेत शिवसेनेचे बळ वाढेल तसेच लोकांची सहानुभूतीही मिळेल हा धोका आहे. जो भाजपला घ्यायचा नाही. त्यामुळे भाजप काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.