लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) सदस्यांमध्ये एका हायप्रोफाईल व्यक्तीचा समावेश झाल आहे. रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची या मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर मंडळात ते प्रमुख सल्लागार म्हणून कार्यकारी समिती मध्ये कार्यरत असतील. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) गणपती जगभरातील गणेशभक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती आहे. वर्षातून केवळ एकदाच आणि गणेशोत्सव काळातच येणाऱ्या या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी केवळ मुंबईच नव्हे तर देश आणि जगभरातील भक्तांची गर्दी असते.

लालबागच्या राजाचे व्हीआयपी भक्त

लालबागचा राजा केवळ सर्वसामान्यच नव्हे तर, सेलिब्रेटी आणि उच्चभ्रू मंडळींमध्येही प्रसिद्ध आहे. बॉलिवूड, क्रीडा, उद्योग अशा एक ना अनेक क्षेत्रात सक्रीय असलेले आणि यश मिळवलेले अनेक लोक चरणी लीन होण्यासाठी बाप्पाच्या दरबारात हजेरी लावतात. एकूणच काय तर सामान्यांप्रमाणेच व्हीआयपी मंडळीही लालबागच्या राजाची भक्त आहे. मात्र, व्हीआयपी मंडळी भक्त असली तरी, त्यांचा मंडळामध्ये मानद म्हणून का होईना समावेश होण्याची घटना तशी विरळाच. त्यामुळेच अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून झालेल्या निवडीबाबत अनेकांकडून कुतुहल व्यक्त होत आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय

लालबाचा राजा गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या बैठकीत मंडळाच्या सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला. ज्यामुळे अनंत अंबानी यांचा मानद सदस्य म्हणून निवडीचा मार्ग मोकळा झाला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अंबानी कुटुंबाने धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा विचार करुन त्यांचा मंडळात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंबानी कुटुंब हे भारत आणि जगभरातील श्रीमंतांपैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यातही मुकेश अंबानी यांच्या नावाची काहीशी अधिकच चर्चा असते. अलिकडेच अनंत अंबानी आणि राधीका मर्चंट यांचा विवाह सोहळा पार पडला. ज्याची देशभरातील प्रसारमाध्यमे आणि काही प्रमाणात जगभरातही चर्चा झाली. या विवाहसोहळ्यास जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (हेही वाचा, Anant-Radhika Wedding Return Gift: अनंत अंबानींनी मित्रांना दिले करोडो रुपयांचे रिटर्न गिफ्ट; किंमत ऐकून सरकेल पायाखालची जमीन)

दरम्यान, मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली असून, बाजार गर्दीने फुलून गेले आहेत. विविध मंडळांचे सदस्य देखावे उभे करण्यात रंगून गेले आहेत. दुसऱ्या बाजूला मुंंबई पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत.