Palghar News: पालघर जिल्ह्यातील सकवार येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद शाळेत जाणीव चॅरिटेबल ट्र्स्टने 'शिक्षणाची गाडी आली' या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल कला व क्रीडा महोत्सव 2023-2024 चे आयोजन केले होते. हा कार्यक्रम 9 आणि 10 फेब्रुवारीला पार पडला. आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी आणि शिक्षणाचे महत्त्व मुलांना समजावे हाच या उपक्रमातील मुख्य हेतू होता. शाळेतील 198 विद्यार्थ्यांसोबतच 40 माजी विद्यार्थी व वीट भट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या 28 मुलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. (हेही वाचा- विलेपार्लेतील साठ्ये महाविद्यालयात रंगणार माध्यम महोत्सव,)
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री, रामचंद्क परब, प्रशासकीय व्यवस्थापक श्री.सुनील पाठक, शाळेचे मुख्याध्यापक श्री.आनंद राऊत सर, माजी शिक्षक श्री.जलाराम भोंगे सर, साठये महाविद्यालयाच्या (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) कार्यक्रम अधिकारी श्री.बोंबे सर, माजी जिल्हा समन्वयक श्री.विनोद गवारे सर, सकवार ग्रामपंचायतचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
विशेष म्हणजे या महोत्सवात क्रिकेट, खो- खो, कबड्डी, लंगडी या मैदानी खेळांसोबतच कॅरम, बुध्दिबळ, हस्ताक्षर, नृत्य अशा मुलांमधील सुप्त गुणांना वाद देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर साठये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी श्रीमती श्यामला गवारे मॅडम, श्री.संदीप कदम सर या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.