RBI कडून मिळालेले अतिरिक्त 99 हजार कोटी कोरोना लसीकरणासाठी वापरावा, रोहित पवारांचा केंद्र सरकारला सल्ला
NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

देशात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता देशात लसीकरण युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. त्यात लसीकरणाचा तुटवडा पडणे देशाला परवडणारे नाही. अशा परिस्थितीत आरबीआयकडून (RBI) मिळालेले अतिरिक्त 99 हजार कोटी त्यासाठी वापरावे असा सल्ला कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्र सरकारला दिला आहे. याबाबतचे ट्विट रोहित पवारांनी केले आहे. कोरोना संकटात आरबीआयनं केंद्र सरकारला (Central Government) खजान्यातील 99,122 कोटी रुपये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

"देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला करोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली 35 हजार कोटी रुपयांची तरतूद आणि रिझर्व बँकेकडून मिळालेले अतिरिक्त 99 हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील." अशा आशयाचे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.हेदेखील वाचा- उद्धव ठाकरे खरंच BEST CM; कोकण दौऱ्यावरुन MNS चा उपहासात्मक टोला

"राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं करोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि जीएसटीमध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण ठरवावं. असं केलं तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू." असेही ते आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल बोर्डाने मोठा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारचा दिलासा मिळणार आहे. बोर्डाच्या बैठकीत 99,122 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम केंद्र सरकारला वर्ग करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. जुलै 2020 ते मार्च 2021 या कालावधीतील 9 महिन्यांची अतिरिक्त रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.