Amravati Violence: अमरावती हळूहळू पुर्वपदावर; इंटरनेट सेवा सुरु, मात्र संचारबंदी कायम
Amravati Violence | (Photo Credits-Twitter)

मोठ्या हिंसाचारानंतर अमरावती (Amravati Violence) पुन्हा एकदा पुर्वपदावर येत आहे. परिस्थिती निवळत असल्याचे पाहून बंधने हळूहळू शिथील केली जात आहेत. आजपासून अमरावती (Amravati) शहरातील इंटरनेट सेवा (Internet Service) पुर्वपत करण्यात आली. असे असले तरी संचारबंदी (Curfew) मात्र कायम आहे. ही संचारबंदी पुढील काही काळ अशीच सुरु राहण्याची चिन्हे आहेत. तब्बल सहा दिवसानंतर अमरावती शहरातील इंटरनेट सुविधा सुरु करण्यात येत आहे. त्रिपूरा येथे झालेल्या कथीत घटनेनंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद अनपेक्षीतरित्या उमटले. अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये मुस्लिम समाजातील काही मंडळींनी मोर्चा काढला. या मोर्चात घडलेल्या हिंसाचारानंतर दुसऱ्या दिवशी भाजपने बंद पाळला. या बंदला हिंसक वळण मिळाले आणि सामाजिक वातावरण अगदीच खराब झाले.

अमरावती शहरात घडलेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना पाहायला मिळाल्या. समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरील वाहनांचे नुकसान केले. काहींनी वाहनांना आगी लावल्या. काही ठिकाणी बंद दुकाने फोडण्यात आली. दगडफेकही मोठ्या प्रमाणावर आली. सोशल मीडियावरुन पसरलेल्या अफवांनीही त्यात भर घातल्याचे पुढे आले. परिणामी पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संचारबंदी लागू केली. तसेच, इंटरनेट सेवाही बंद केली. (हेही वाचा, Amravati Violence: अमरावतीमधील कर्फ्यू पुढील आठवड्यापर्यंत राहणार; हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 188 जणांना अटक)

हिंसाचाराच्या घटनेला 6 दिवस उलटल्यानंतर हळूहळू सर्व परिस्थितीचा आढावा घेत इंटरनेट सेवा पुर्ववत करण्यात आली. दरम्यान, इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे 'वर्क फ्रॉम होम' करणारे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, सरकारी कार्यालये, इंटरनेट सेवेचा वापर करुन चालवल्या जाणाऱ्या यंत्रणा या सर्वांवरच मोठा परिणाम झाला. या सर्वांना इंटरनेट सेवा खंडीत झाल्याचा फटका बसला.

काय आहे प्रकरण?

त्रिपूरात घडलेल्या घटनेवरुन अमरावती शहरात काही मुस्लिम नागरिकांनी 12 नोव्हेंबरला काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण मिळाले. या मोर्चाचा निशेध करत भाजपने 13 नोव्हेंबर रोजी बंद घोषीत केला. या बंदलाही हिंसक वळण मिळाले. यात काही भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड केली, असा आरोप आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शनिवारपासून (13 नोव्हेंबर) अमरावतीत संचारबंदी लागू केली. शहरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. जी आजपासून पुन्हा सुरु करण्यात आली.