
राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग वाढू लागल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. अनेक जिल्हा आणि शहरांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. अमरावतीमध्ये काल रात्री 8 पासून एकदिवसीय लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. तर पुण्यात नाईट कर्फ्यूसह शळा, महाविद्यालयं देखील पुन्हा बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, अमरावती (Amravati), अकोला (Akola), यवतमाळ (Yavatmal), बुलढाणा (Buldhana), वाशिम (Washim) या जिल्ह्यांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. कोविड-19 चा संसर्ग टाळण्याासाठी या जिल्ह्यांमध्ये काही नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी हे आदेश पारीत केल्याची माहिती समोर येत आहे.
जाणून घेऊया नवे नियम:
# सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरु राहतील.
# सर्व हॉटेल्स, उपहारगृहांमध्ये केवळ पार्सल सुविधा सुरु राहील.
# लग्नसोहळ्यांसाठी वधू-वरांसह केवळ 25 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.
# बस वाहतूक केवळ 50 टक्के क्षमतेने सुरु राहील.
# राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी.
# खासगी आणि सरकारी वाहनात मास्कचा वापर बंधनकारक.
# रिक्षामध्ये चालकासह दोघांनाच प्रवासाची परवानगी.
# धार्मिक स्थळांमध्ये एकाच वेळी केवळ 10 व्यक्तींना परवानगी देण्यात येईल.
# संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद.
# सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे बंद.
दरम्यान, आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार असून लॉकडाऊन, निर्बंध याबद्दल ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे त्यानंतर राज्यातील नियमांचे एकूण चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल. (Pune Night Curfew: पुण्यात पुन्हा रात्रीची संचारबंदी; शाळा, महाविद्यालयं 28 फेब्रुवारी पर्यंत बंद)
आरोग्य विभागाच्या अपडेटनुसार, राज्यात कालच्या दिवसांत 6281 नव्या रुग्णांची भर पडली असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2567 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या नव्या वाढीमुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 20,93,913 इतकी झाली असून मृतांचा आकडा 51,753 वर पोहचला आहे. तर 19,92,530 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 48,439 सक्रीय रुग्ण आहेत.