Amravati Accident: अमरावतीत बस दरीत उलटून झाडांमध्ये अडकली; चालकासह 7 प्रवासी जखमी
Accident (PC - File Image)

परतवाडा ते धारणी राज्‍य महामार्गावर अमरावतीहून मध्‍यप्रदेशातील खंडवा येथे जाणारी एसटी बस मेळघाटातील घटांग नजीक अनियंत्रित होऊन रस्‍त्‍याच्‍या कडेला दहा ते बारा फूट दरीत उलटली. ही बस झाडांना अडकल्‍याने मोठा अपघात टळला. या अपघातात बसचालकासह 7 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक निकामी झाल्‍याने हा अपघात झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. खंडवा एस टी बस मेळघाटात पोहचली असता एअर पाईप फुटला. त्यामुळे 17 वा टर्न घटांग येथे बस 40 फुट खोल दरीत बस कोसळली आहे. या अपघातात 2 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सेमाडोह आरोग्य केंद्रात त्यांना भर्ती करत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा, परतवाडा तसेच समरसपुरा पोलीस ठाण्‍याचे कर्मचारी तातडीने अपघातस्‍थळी पोहोचले. बसमध्‍ये एकूण 64 प्रवासी होते. बसचालक मोहम्‍मद मुजाहिद याच्‍यासह 7 प्रवासी या अपघातात किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल करण्‍यात आले, तर बसचालकाला परतवाडा येथील रुग्‍णालयात नेण्‍यात आले. बस उलटून रस्‍त्‍याच्‍या खाली दरीत 10  ते 15  फुटांवर मोठ्या झाडांना अडकली, त्‍यामुळे जीवितहानी झाली नाही. इतर प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्‍यात आले.