केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यात भाजने मुंबई महापालिका निवडणूक 2022 (BMC Election 2022) चे रणशिंग फुंकले आहे. आगामी काळात कधीही मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. त्यादृष्टीने अमति शाह यांनी भाजप (BJP ) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तळागाळात उतरुन काम करण्याच्या सूचना दिल्या. मुंबई महापालिकेत 150 जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य असेल असे सांगतानाच राजकारणात काहीही सहन करा परंतू धोका सहन करु नका, असे सांगत 'मातोश्री'ला इशाराही दिला. प्रथमच शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव घेऊन अमित शाह म्हणाले, त्यांनी आपल्याला धोका दिला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती तोडली.उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे, अशा स्पष्ट शब्दांमध्ये आगामी काळात मुंबईत भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा सामना रंगेल असे संकेत दिले.
महाराष्ट्रात शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने मते मागितली आणि सत्तेत आली. असे असूनही आमच्याशी धोका करण्यात आला, असेही अमित शाह म्हणाले. राजकारणात काहीही सहन करता येईल परंतू धोका नाही. धोका देणाऱ्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने जमीनीवर उतरुन काम करायला हवे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी युती तोडली भाजपपेक्षा आपल्याच जागा अधिक निवडून येतील असा त्यांचा अंदाज होता परंतू तो अंदाज चुकला. आपल्या जागा जास्त निवडून आल्या. (हेही वाचा, Saamana Editorial: शिवसेनेशी दोन हात करता येत नाहीत, म्हणून फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन: सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा)
महाराष्ट्रात जे हिंदूविरोधी राजकारण आहे ते बंद झालं पाहिजे. हिंदूविरोधात महाराष्ट्रात सुरु असलेले राजकारण संपायला हवे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने काम करायला हवे. राजकारणात धोका देऊन सत्ता मिळवलीत. आता तुमचा पक्ष छोटा झाला याला तुम्हीच जबाबदार आहात, असेही अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना थेट म्हटले आहे.