Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

धुळवड (Dhulivandan 2022 ) सणानिमित्त मित्र रंग लावतील या भीतीने इमारतीच्या गच्चीवर जाऊन लपलेल्या तरुणाचा खाली पडून मृत्यू झाला आहे. सूरज मोरे असे या तरुणाचे नाव आहे. तो अंबरनाथ (Ambernath) येथील शिवाजीनगर परिसरात मधल्या आळीत वास्तव्यास होता. वास्तव्यास असेलेल्या ठिकाणीच ही घटना घडली. या घटनेमुळे या तरुणाचे कुटुंबीय आणि मित्रांना धक्का बसला आहे. रंगाला घाबरुन लपून बसने या तरुणाच्या जीवावर बेतले. रंगाचा उत्सव असलेल्या होळीतच असा बेरंग झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सूरज मोरे हा आपला भाऊ तुषार मोरे याच्यासह परिसरातच राहणाऱ्या अविनाश पाटील या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. अविनाश पाटील हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर नव्यानेच बांधण्यात आलेल्या इमारतीत वास्तव्यास होता. या इमारतीखाली तिघेजण गप्पा मारत उभे होते. दरम्यान, परिसरातील त्यांचेच मित्र तेथून निघाले असता त्यांना हे तिघेजण गप्पा मारत असल्याचे दिसले. त्यामुळे ते या तिघांना रंग लावण्यासाठी आले असता सूरज आणि तुषार इमारतीत पळाले. (हेही वाचा, Video Call वर कन्येचा चेहरा दाखविण्यास पत्नीचा नकार, पतीची आत्महत्या; बदलापूर येथील घटना)

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तुषार लपला तर सूरजने थेट इमारतीची गच्चीच गाठली. तो गच्चीतच झोपून राहिला. दरम्यान, मित्रांनी तुषारला पकडून खाली आणले. इतर मित्र सूरजला शोधत होते. पण तो अचानक गच्चीला असलेल्या डक्टमधून खाली पडला. त्याला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केरुन पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर त्याला उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात सूरजला दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. णी शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.