Alyque Padamsee Passed Away : जाहिरात क्षेत्रातला बादशाहा असा लैकीक असलेले आणि पद्मश्री पुरस्कार विजेते बहुआयामी व्यक्तिमत्व अॅलेक पदमसी (Alyque Padamsee)यांचे निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. जाहिरात क्षेत्रातील अभिनव प्रतिभेमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले. तसेच, रिचर्ड अॅटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात मोहम्मद अली जिना यांची भूमिका पदमसी यांनी साकारली होती. या भूमिकेचेही प्रचंड कौतुक झाले.
जाहिरात क्षेत्रातील प्रतिभेचा मापदंड म्हणूनही अॅलेक पदमसी यांच्याकेड पाहिले गेले. हमारा बजाज, एमआरएफचा पीळदार माणूस, सर्फ,लिरील या जाहिरातींची संकल्पना आणि अॅलेक पद्मसी यांची होती. त्यांच्या या संकल्पनांचे प्रचंड कौतुक झाले. लिंटास या जगप्रसिद्ध जाहिरात कंपनीचे ते तब्बल १४ वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले. तसेच, जगभरातील सुमारे १०० पेक्षाही अधिक कंपन्यांच्या ब्रॅंड्सना लोकप्रियता मिळवून देण्यात पद्मसी यांचा सिंहाचा वाटा होता.
एखाद्या चित्रपटातील व्यक्तिरेखेप्रमाणे अॅलेक पदमसी हे आपले आयुष्य जगले. अनेक चड-उतारांनी भरलेले अॅलेक पदमसी यांचे व्यक्तिगत आयुष्यही अनेक गोष्टींचे मिश्रण होते. त्यांनी लिहिलेले 'डबल लाईफ' हे आत्मचरित्र प्रचंड गाजले. अनेक भाषांमध्ये त्यांचा अनुवादही झाला. या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की, प्रत्येक पानावरचे प्रत्येक वाक्य हे जणू सुभाषीतच वाटते.