Mahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2024) होणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे तीन पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत (Seat Sharing) चर्चा सुरू झाली आहे, मात्र कोण किती जागा लढवणार याचा निर्णय आता सर्वेक्षणानंतर होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, महाविकास आघाडीने एकत्रितपणे एक नोडल एजन्सी (Nodal Agency) नेमली आहे, जी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांचे सर्वेक्षण करेल. कोणत्या पक्षाला राज्यात किती जागांवर निवडणूक जिंकता येईल, याची माहिती या सर्वेक्षणातून मिळणार आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकू शकतो? या सर्वेक्षणाच्या आधारे तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप करण्यात येणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांना राज्यात मोठे यश मिळाले होते. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांना जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवायची आहे. मात्र, महाविकास आघाडीतील विधानसभेच्या जागांचे वाटप गुणवत्तेवरच होईल, असे तिन्ही पक्षांचे नेते वेळोवेळी सांगत आहेत. त्यामुळे आता या पक्षांनी गुणवत्तेचे निकष लावण्यासाठी नोडल एजन्सी नेमली आहे. जी लवकरच राज्यातील तिन्ही पक्षांचे सर्वेक्षण सुरू करणार आहे. यामुळे महाविकास आघाडीत जागापाटपात होणारा वाद टाळणे शक्य होणार आहे. (हेही वाचा -Maharashtra Assembly Elections 2024: महाविकास आघाडी लोकांना पर्याय देईल; शरद पवार यांचे आश्वासन)
महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा?
प्राप्त माहितीनुसार, प्राथमिक चर्चेत काँग्रेसला 105 ते 110, उद्धव ठाकरे शिवसेनेला 90 ते 95, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 70 ते 75 आणि 10 ते 12 जागा समाजवादी पक्ष, डावे पक्ष, शेतकरी अशा अन्य छोट्या मित्रपक्षांना देण्यात येतील. तिन्ही पक्षांनी या नोडल एजन्सीला 20 ऑगस्टपूर्वी सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. जेणेकरून जागा वाटपात विलंब होऊ नये. मात्र, लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या पक्षाने त्या-त्या भागातील सर्व विधानसभा जागांसाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या जागा आघाडी पक्षांनी जिंकल्या होत्या, त्याच मूळ पक्षाला मिळतील, याचीही काळजी घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (हेही वाचा -Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar: शरद पवार यांच्यासोबत काय चर्चा झाली? छगन भुजबळ यांनी दिली सविस्तर माहिती)
20 ऑगस्ट रोजी मुंबईत सभेचं आयोजन -
दरम्यान, 16 ऑगस्ट रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात तिन्ही पक्षांच्या अधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त परिषद होणार आहे. तथापी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 20 ऑगस्ट रोजी मुंबईत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. या सभेसाठी देशभरातून कार्यकर्ते मुंबई गाठणार आहेत. या कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार असून त्यासाठी काँग्रेस नेत्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले आहे. या कार्यक्रमाला राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत.