Adani Sharad Pawar Fadanvis (Image Credit - Twitter)

हिंडेनबर्ग रिपोर्टवरून गौतम अदाणी (Gautam Adani) यांच्या विरोधात कॉंग्रेस सह देशातील विरोधी पक्ष आवाज उठवत आहेत. एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणावर जेपीसी ऐवजी देशातील सर्वोच्च न्यायसंस्था सुप्रीम कोर्टाच्या समितीच्या अहवाल अधिक प्रभावी राहील अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. शरद पवारांनी घेतलेल्या या भूमिकेवरुन आता काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी शरद पवारांवर टिका केली आहे. या टिकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तर दिले आहे.

काँग्रेस प्रवक्ता अलका लांबा यांनी शरद पवार आणि गौतम अदाणी यांचा फोटो ट्विट केला. त्यावर लिहिले की, “भित्रे, स्वार्थी लोक स्वत:च्या हितासाठी हुकूमशाही सत्ताधीशांचे गुणगान गात आहेत. पण, राहुल गांधी एकटे देशातील जनतेसाठी लढाई लढत आहेत. तसेच, भांडवलदार चोर आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही,” असं अलका लांबांनी म्हटलं.

या ट्विटरला उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली आहे. “राजकारण होत आणि जाते. पण, काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांचा ३५ वर्षातील मित्रपक्ष आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री असणाऱ्यांबद्दल केलेले ट्विट आश्चर्यकारक आहे. भारतातील राजकीय संस्कृतीत राहुल गांधी घाणेरडे राजकारण करत आहेत,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या कथित संबंधांवरून टीकेची झोड उठवली आहे. पण आता त्यावर शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.