Akole Band: अहमदनगर जिल्ह्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंद
Trupti Desai Against Indurikar Maharaj (Photo Credits: File Image)

हभप निवृत्ती इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) ओझर इथे आपल्या कीर्तनात 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असे वक्तव्य केले होते. यावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हेतर, देसाई यांनी इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळे फासण्याचे वक्तव्यही केले होते. यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला करत इंदोरीकर महराजांच्या समर्थनार्थ आज संपूर्ण अकोले बंदची (Akole Band) हाक दिली आहे. यासाठी इंदोरी ते अकोले मोटारसायकल रॅली, गावातून भजन दिंडी आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सम-विषमच्या वादानंतर इंदोरीकरांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी, असेही इंदोरीकर महाराज म्हणाले होते.

इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्याने उभे राहण्याचा निर्णय घेतला. निवृत्ती महाराजांची नाहक बदनामी सुरु आहे. महाराजांनी कीर्तनात पुत्र प्राप्तीविषयी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. इंदोरीकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिलगिरी व्यक्त करुनही सूडभावनेने गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचून महाराजांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न तृप्ती देसाई करत असल्याचा आरोप अकोलेकर करत आहे. अकोलेकरांनी महाराजांच्या समर्थनार्थ उभे राहत गाव-गावांतील ग्रामपंचायतीचे ठराव करत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विकृत मानसिकतेच्या तृप्ती देसाई या अकोलेकरांच्या भावना दुखावत असून या प्रवृत्तीला धडा शिकवण्याची भूमिका अकोलेतील तमाम ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे तृप्ती देसाई विरुद्ध इंदोरीकर वाद चिघळण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन फॉर्म्युला'बाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांची पलटी, असे बोललो नसल्याचा खुलासा

इइंदोरीकर महाराजांचे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन असल्याचे समितीच्या सदस्याने म्हटले आहे. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. इतकेच नाही तर या नोटीसनंतर जर पुरावे मिळाले तर इंदोरीकर महाराजांवर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.