Bombay High Court | (Photo Credits: ANI)

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Bombay High Court - Nagpur Bench) अकोला पश्चिम (Akola West By Poll)  जागेवरील विधानसभा पोटनिवडणूक रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. . न्यायमूर्ती अनिल किलोर आणि एम. एस.जवळकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. मुख्य निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी असताना पोटनिवडणूक घेता येत नसल्याची तरतुद कायद्यात असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. उच्च न्यायालयाने आज (26 मार्च) यावर सुनावणी करताना अकोला ( पश्चिम) निवडणुकीला स्थगिती दिली आहे.

अकोला पोटनिवडणूक घेऊन मतदारांना वेठीस धरले जात आहे तसेच यंत्रणांवर अनावश्यक भार दिला जात आहे. असेही याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. चंद्रपूर, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक एक वर्षाहून अधिक कालावधी असतानाही घेतली गेली नाही मग अकोल्याच्या जागेवर निवडणूक घेत पैशांचा चुराडा कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या युक्तिवाद मान्य करत अकोला ( पश्चिम) पोटनिवडणुकीची अधिसूचना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.  (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024 Schedule: लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आदर्श आचारसंहिता जारी).

याचिकाकर्ते अनिल दुबे यांनी अकोला पश्चिम पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिकाकर्त्याची बाजू कोर्टात ॲड. जगविजयसिंग गांधी मांडली तर निवडणूक आयोगाच्यावतीने ॲड.श्रीकांत धारस्कर व राज्य शासनाच्यावतीने ॲड.देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली. लोकसभेसोबत पोट निवडणूका घेण्याचं जाहीर केल्यानंतर येत्या 26 एप्रिल रोजी अकोल्याची पोट निवडणूक होणार होती.