Molestation | (Photo Credits: Archived, edited)

काही महिन्यांपूर्वी बदलापूर मध्ये शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती त्यानंतर आता अकोला (Akola) शहरामध्ये कोलखेड भागात एका शाळेमध्ये कर्मचार्‍यानेच शाळेतील दहा मुलींचा लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हेमंत विठ्ठल चांदेकर (Hemant Chandekar) या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी 5 मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी शाळेचं कामकाज पाहण्याची जबाबदारी हेमंत चांदेकर वर दिली होती. हेमंतने परिस्थितीचा गैरफायदा घेत दहा मुलींसोबत शारीरिक लंगट करत विनयभंग केल्याचं समोर आलं आहे.

शाळेमधील शिक्षिका प्रशिक्षण संपवून आल्यानंतर विद्यार्थिनींकडून हा प्रकार त्यांच्या कानावर पडला. शिक्षकांनी शाळेच्या संचालकांना हे सांगितल्यानंतर त्यांनी चाईल्ड हेल्पलाईन कडे मदत मागितली. आता आरोपी हेमंत चांदेकरला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या चांदेकरची रवानगी न्यायालयीन कोठडी मध्ये करण्यात आली आहे.

अकोल्यात उर्दू शाळेच्या सचिवावर शारीरिक आणि लैंगिक छळाचे आरोप

महिनाभरापूर्वी अकोल्यातील एका उर्दू शाळेच्या सचिवावर शारीरिक आणि लैंगिक छळाच्या आरोपांमुळे  छापे टाकण्यात आले होते. महिला शिक्षिकांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता तसेच त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ आयोगाला पुरावे सादर केले होते. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या घटनेनंतर  राज्यातील सर्व अल्पसंख्याक शाळांमध्ये तक्रार पेट्या बसवल्या जातील अशी घोषणा केली आहे. गंभीर तक्रारींच्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील दोन सरकारी अनुदानित उर्दू शाळांवर आयोगाने अलिकडेच टाकलेल्या छाप्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.