
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pragya Satav Attack) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे. महेंद्र डोंगरदिवे असे हल्लेखोराचे नाव आहे. तो 40 वर्षांचा आहे. त्याने मद्यधूंद अवस्थेत हल्ला केल्याची प्राथमिक माहती आहे. आखाडा बाळापूर पोलीस (Akhara Balapur Police ) त्याच्याकडे कसून तपास करत आहेत. चौकशीअंती अनेक गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे. झालेल्या हल्ल्याबद्दल प्रज्ञा सातव यांनी स्वत:च ट्विटरद्वारे माहिती दिली होती. हल्लेखोराने हिंगोलीत एका ठिकाणी सातव यांच्यावर पाठिमागून वार केला. ज्यात त्या जखमी झाल्या.
प्रज्ञा सातव यांनी हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, हल्लोखोराने त्यांच्यावर पाठिमागून हल्ला केला. ज्यात त्यांना गंभीर मार लागला. अज्ञातांकडून त्यांना राजकारणात रोखण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्या जीवालाही धोका आहे. मी आमदार आहे आणि एखाद्या आमदार असलेल्या महिलेवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. ज्यांना लढायचे आहे त्यांनी समोरुन लढावे. उगाच पाठिमागून वार करुन नयेत, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. (हेही वाचा, प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोधी निवड, भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज माघारी)
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, प्रज्ञा सातव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास करत महेंद्र डोंगरदिवे नावाच्या एका व्यक्ती अटक करण्यात आली आहे. हिंगोलीचे पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी बोलताना सांगितले की, प्रज्ञा सातव यांच्यावर डोंगरदिवे याने पाठिमागून हल्ला केला. त्याच्या विरोधात भारतीय दंड स्ंहिता कलम 352,353, आणि 323 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अद्यापही तपास आणि चौकशी करत आहे. लवकरच सर्व सत्य समोर येईल.