Akashwani | Twitter

डिजिटल मीडीया आणि 24 तास चालणार्‍या न्यूज चॅनेलच्या गर्दीमध्ये आकाशवाणी वर बातम्या ऐकणार्‍यांचा एक वर्ग आहे. पण आता प्रसार भारती कडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आकाशवाणी पुणे केंद्रातील (Akashvani Pune Kendra) प्रादेशिक वृत्त विभाग बंद केला जाणार आहे. त्याबाबतचा लेखी आदेशही आला आहे. 19 जून पासून पुणे विभागाकडून दिले जाणारे प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र औरंगाबाद वृत्त विभागाकडे देण्यात आले आहे.

आकाशवाणी वर पुणे प्रादेशिक वृत्त विभागाकडून सकाळी 7.10 आणि एफएम वाहिनीवरील 8.10, 10.58, 11.58 आणि संध्याकाळी 6 वाजताच्या बातम्या आता बंद होणार आहेत. यासोबतच सकाळी 8.30 चे राष्ट्रीय बातमीपत्र देखील बंद होणार आहे. या बातम्या आता औरंगाबाद केंद्रावरून दिल्या जाणार आहेत. दरम्यान पुण्यातील घडामोडींची दखल औरंगाबाद वरून कशी घेतली जाईल याबाबत मात्र अनिश्चितता आहे.

भारतामध्ये आकाशवाणी पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते होते. सुमारे 24 लाख श्रोते नियमित कार्यक्रम ऐकत होते. 1953 साली स्थापन झालेल्या पुणे आकाशवाणी केंद्रावर मागील 40 वर्षांपासून बातम्या प्रसारित केल्या जात होत्या.

सध्या पुण्याच्या वृत्त  विभागामध्ये  एक भारतीय माहिती सेवेचा अधिकारी (प्रभारी), एक वृत्तनिवेदक आणि एक हंगामी वृत्तसंपादक याशिवाय हंगामी वार्ताहर इतक्या मनुष्यबळावर काम सुरू होते. पण केवळ पूर्णवेळ भारतीय माहिती सेवेचा अधिकारी उपलब्ध नाही म्हणून हा विभाग आता बंद करून औरंगाबाद मधून त्याचं कामकाज केले जाणार आहे.