सध्या संपूर्ण राज्यातील हवामान बेभरवशी झाले आहे. सततच्या होत असलेल्या या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. गुरुवारी जेव्हा दिवसभरात शहरातील हवेची पत कशी आहे ते तपासण्यात आलं, तेव्हा तो 'अत्यंत वाईट' या स्तरावर नोंदवण्यात आला आहे. 'सफर इंडिया' या संस्थेनुसार नवी मुंबईतील हवा 310 एककात आहे. त्यामुळे धूलिकणांचे प्रमाण जास्त असल्या कारणाने आता बदलत्या हवामानासोबतच या समस्येचाही सामना करायची वेळ नवी मुंबईकरांवर आलेली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र नवी मुंबईत औद्योगिक प्रदूषण नसल्याचे सांगितले आहे. तर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही सफर इंडिया सारख्या खासगी संस्थेने काढलेले निष्कर्ष मानीत नाही असे विधान केले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून हवेतील धुक्याचे प्रमाण वाढले आहे. तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची नोंद झाली आहे. शहरातील 30% कंपन्याच सुरु असून 70% बंद पडलेल्या आहेत, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. हिवाळ्यात तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण मोठे दाखवले जात असले तरीही त्याची बरीचशी कारणे तांत्रिक आहेत. शहरातील हवा अत्यंत वाईट स्तरात मोडत नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा. Delhi Air Pollution: निष्काळजी अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय)
हे धूलिकण वाढण्यामागचं कारण देताना अधिकारी म्हणतात, 'शहरात मोठ्या प्रमाणावर होत असलेली नवीन बांधकामे आणि वाहनातून उत्सर्जित होत कार्बन मोनॉक्साईडचा या मागे मोठा हात आहे.' एअर क्वालिटी इंडेक्सची संख्या जर 300 च्या वरती असेल, तर ते 'अत्यंत वाईट' मानलं जातं. 400 च्या वरती असेल तर मात्र ते 'अत्यंत गंभीर' मानलं जातं.