2016 अहमदनगर सामूहिक बलात्कार (Ahmednagar Gang Rape Case) प्रकरणातील पीडिता आणि तिच्या पतीला बलात्कारचा गुन्हा मागे घेण्यासाठी जबरदस्ती करत विवस्त्र करून मारहाण केल्याचे तसेच पेट्रोल अंगावर ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे एक वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते, याबाबत संबंधित दाम्पत्याने पोलिसात तक्रार देखील नोंदवली होती, मात्र या प्रकरणात आता वेगळाच ट्विस्ट समोर येत आहे. विवस्त्र करून मारहाणीची तक्रार ही पतिपत्नीचा बनाव असल्याचा मोठा खुलासा पोलिसांनी तपासातून सिद्ध केला आहे. ज्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली त्या पाच जणांकडून पैसे लाटण्याचा या पतिपत्नीचा प्रयत्न होता, त्यामुळे दोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, खोटी फिर्याद देणे, पोलिसांची प्रतिमा मलिन करणे आदी आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी खुलासा करत महिला तिचा पत्नी व अन्य पाच जणांवर हा बनाव रचण्याचा गुन्हा दाखल केला त्यानंतर संबधित महिलेने पोलिसांच्या समोरच आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित महिलेच्या 2016 सालच्या तक्रारीन्वये तोफखाना पोलिसांकडे सामूहिक अत्याचाराचा गुन्हा आठ जणांविरुद्ध दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी 24 फेब्रुवारी 2020 ला नगरमध्ये या महिलेचे पतीसह अपहरण करून त्यांना विवस्त्र करून, त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून मारहाण केल्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वी तोफखाना पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला, यामध्ये पोलिसही गुन्हेगारांना सामील होते असा जबाब महिलेने तक्रारीत नोंदवला होता.
मात्र पोलिसांनी संशयातून या तक्रारीची उलट तपासणी सुरू केली, दोन दिवसांपासूनच हा बनाव असल्याचा उलगडा झाला. याच आधारे गुरुवारी पोलीस या महिलेच्या घरी चौकशीसाठी गेले होते, त्यावेळेस आपले खोटे उघड झाल्याचे लक्षात येताच महिलेने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यावेळी सुद्धा पोलिसांनी तत्परतेनं तिला रुग्णालयात दाखल केले तिची प्रकृती सध्या स्थिर असून आता तिच्यावर आत्महत्या प्रयत्नाचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडोओ बनवला जात असताना महिलेची या व्हिडिओला पूर्ण संमती होती, क्लेरा ब्रुस विद्यालयाच्या एका वर्ग खोलीत तयार केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यासाठी मोबाइलचा वापर करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या या मोठ्या तपासासाठी त्यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.