Coronavirus In Maharashtra | Photo Credits: File Photo

कोरोना रुग्ण (Corona Patient) हे काही आरोपी नाही त्यामुळे त्यांची नावे प्रसिद्ध करण्यास काहीच हरकत नाही असे म्हणत काल मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)  यांनी कोरोनाच्या रुग्णांच्या नावाची घोषणा व्हावी अशी मागणी केली होती, त्यांनतर अवघ्या काहीच तासात अहमदनगरच्या (Ahmednagar) सिव्हिल हॉस्पिटल मधून निघून केलेल्या कोरोना संशयित रुग्णांच्या नावाची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, ही यादी सिव्हिल हॉस्पिटलच्या रीतसर पत्रावर होती, त्यामुळे ती अधिकृत असणार हे देखील स्पष्ट होते.याबाबत अधिक तपास केला असता ही यादी व्हायरल करण्यामध्ये मनसे नेते संजीव पाखरे यांचा देखील समावेश असल्याचे दिसून आले, एकीकडे रुग्णांची माहिती उघड न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही अशा प्रकारे यादी व्हायरल केल्याने पाखरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच तयार करण्यात आलेल्या मनसेच्या शॅडो कॅबिनेट मध्ये पाखरे यांचा समावेश आहे.

(हेही वाचा- पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये आजपासून 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींंना एकत्र जमण्यास बंदी)

प्राप्त माहितीनुसार, सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी कैलास काशिनाथ शिंदे यांनी याबाबत तक्रार नोंदवताना यादी का तयार करण्यात आली होती यावर सुद्धा स्पष्टीकरण दिले, कोरोनाचे तीन संशयित रुग्ण हॉस्पिटल मधून अचानक गयाब झाले असता या तिघांचा शोध घेण्यासाठी ही यादी देण्यात आली होती, मात्र काही काळाने हे तिन्ही रुग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये परतले. मात्र त्यांनतर काहीच वेळात या रुग्णांची यादी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. या संदर्भात सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात मनसेचे पुण्याचे उपाध्यक्ष संजीव पाखरे यांनी ही नावे व्हायरल केल्याचे उघड झाले. ज्यांनंतर पाखरे यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना ग्रस्त रुग्णानाचा आकडा आता वाढतच आहे, काही वेळापूर्वी मुंबई आणि उल्हासनगर येथील 2 महिलाना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होताच हा आकडा आता 47 वर पोहचला आहे. अशावेळी रुग्णांची किंवा संशियतांची नावे उघड झाल्यास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागू शकतो यामुळे कोणत्याही कोरोना रुग्णाचे नाव आतापर्यंत जाहीर करण्यात आलेले नाही.