Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रामध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन देखील यंदा 2 दिवसांचं होणार आहे. 14 आणि 15 डिसेंबर दिवशी आयोजित यंदाच्या मुंबई मध्ये होणार्‍या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज (13 डिसेंबर) भाजपाने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगत सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मीडीयाशी बोलताना सरकार चर्चेपासून पाळ काढत आहे असे म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी हिवाळी अधिवेशन अवघ्या 6-7 तासाचे होणार असल्याने शक्य तितक्या वेळेत सभागृहात चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोना संकटकाळात झालेला भ्रष्टाचार, मराठा आरक्षाचा परिस्थिती, वीज बिलांचा मुद्दा ते अगदी मुंबई मेट्रो आणि त्याचा कार डेपो अशा अनेक गोष्टींवर बोट ठेवलं आहे. दरम्यान 14 डिसेंबरला केवळ शोकप्रस्ताव आहे आणि 15 डिसेंबरला काही तासांचा वेळ मिळणार आहे असे म्हणताना जर सार्‍या पक्षांचे मेळावे राज्यात होऊ शकतात तर अधिवेशन थोडं वाढवता आलं असतं असेदेखील म्हटले आहे.

महाराष्ट्रात सध्या अघोषित आणीबाणी असल्याची परिस्थिती आहे. सरकारच्या विरोधात बोलणार्‍याला तुरूंगात टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. सत्ता मिळाल्याने अहंकारातून काम सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर लावला आहे. मुंबई मेट्रो कार डेपो आरेमध्येच होणं योग्य आहे यावर ते ठाम आहेत. 2021 पर्यंत मुंबईकरांना मिळणारी मेट्रो आता 2024 पर्यंत लांबणीवर पडली आहे. सोबतच कॉस्ट वाढल्याने आता तिकिट दरांवर त्याचा परिणाम होणार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.