महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: नारायण राणे 15 ऑक्टोबरला करणार भाजप पक्षामध्ये प्रवेश; महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील होणार विलीन
नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election)  2019 च्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसंपासून सुरू असलेल्या मेगा भरतीमध्ये नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. नारायण राणे यांनी आता 15 ऑक्टोबर दिवशी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष (Maharashtra Swabhiman Party)  याच्या भाजपामध्ये विलनीकरणासोबतच स्वतः ही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे. राजन तेली यांच्या प्रचारासाठी सावंतवाडी येथे दाखल झालेल्या नारायण राणे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे.

नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

आता नितेश राणेंच्या पाठोपाठ नारायण राणे भाजपामध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश करणार आहे. यापूर्वी 2 वेळेस नारायण राणे यांनी भाजपा प्रवेशाच्या तारखा जाहीर केल्या होत्या. मात्र सत्तेमध्ये भाजपासोबत सहभागी असलेल्या शिवसेनेने त्यावर नाराजी व्यक्त केल्याने नारायण राणे यांचा पक्षप्रवेश टळला होता. नारायण राणे राज्यसभेत भाजपचे सहयोगी खासदार आहेत.

कोकणात शिवसेना - भाजपा युती तुटली

सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेली यांना स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा आहे. नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेनेने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना उमेदवारी अर्ज देऊन राणेंना विरोध नोंदवला.

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदार संघांमध्ये 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक 2019 चे मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे.