महाराष्ट्र राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांसह सार्या आमदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यंदा 7 आणि 8 सप्टेंबर दिवशी महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे. यापार्श्वभूमीवर काल झालेल्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समिती बैठकीत हा निर्णय झाला आहे. दरम्यान विधिमंडळात प्रवेश करण्यापूर्वी सार्यांना त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सादर करणं बंधनकारक राहणार आहे.
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेता, यंदाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन हे सुरक्षित आणि सोशल डिस्टन्सिग पाळून घेतले जाणार आहे. दरम्यान काल विधान परिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान मुंबईमध्ये विधानभवानाच्या मुख्य प्रवेशाजवळ विधिमंडळ सदस्यांसाठी RT PCR कोरोना चाचणी केंद्र 5 आणि 6 सप्टेंबर दिवशी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सकाळी 10 ते 6 दरम्यान सदस्य आणि त्याचे सचिव कोरोना टेस्ट करून घेऊ शकतात. दरम्यान त्यांचा कोरोना अहवाल सचिवालयाकडे पाठवणं बंधनकारक आहे. त्याच्याशिवाय विधिमंडळात 7 तारखेपासून सुरू होणार्या अधिवेशनाकरिता प्रवेश दिला जाणार नाही.