शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये धुसफूस? Prithviraj Chavan यांची विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होट करणाऱ्या 7 आमदारांवर कारवाई मागणी
Prithviraj Chavan | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसमध्येही (Congress) धुसफूस सुरू आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या फ्लोअर टेस्टच्या वेळी काँग्रेसचे अनेक आमदार सभागृहात उपस्थित नव्हते, त्यामुळे आपले आमदार भाजपच्या संपर्कात आहेत की काय, अशी भीती पक्षाच्या नेत्यांना सतावत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्या आमदारांना 'ऑपरेशन लोटस’पासून सावध राहण्यास सांगत आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पक्षाच्या 7 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग' करणारे हे 7 आमदार आहेत, ज्यामुळे काँग्रेस उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसची काही मते फुटल्याचे स्पष्ट झाले होते. आता या आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. क्रॉस व्होट करणाऱ्या सात आमदारांवर कारवाई करण्याची मागणी आपण पक्षाकडे केल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

त्याचवेळी, फ्लोअर टेस्टच्या वेळी काँग्रेस आमदारांच्या अनुपस्थितीच्या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, ‘पक्षाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले पाहिजे हे आपले वैयक्तिक मत आहे. पण मी या आमदारांवर कारवाईची मागणी केलेली नाही.’ महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या एमएलसी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीलाही धक्का बसला होता. यामध्ये भाजपच्या उमेदवारांनी 10 पैकी पाच जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी राष्ट्रवादी-शिवसेनेचे 2-2 उमेदवार विजयी झाले होते, तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला. (हेही वाचा: Shiv Sena: महिला शिवसैनिकांच्या आक्रमकतेमुळे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा काढता पाय)

काँग्रेसने एमएलसी निवडणुकीत दोन उमेदवार उभे केले होते, परंतु त्यांच्या 7 आमदारांच्या 'क्रॉस व्होटिंग'मुळे एका उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. भाजपचे सर्व 5 उमेदवार विजयी झाले तर युतीचे 6 पैकी 5 उमेदवार विजयी झाले. दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या युती सरकारने 4 जुलै रोजी आपले बहुमत सिद्ध केले. सभागृहातील बहुमत चाचणीवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे सुमारे 10 आमदार गैरहजर होते.