Sanjay Raut On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडीवरून मोर्चा काढल्यानंतर संजय राऊत यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
Sanjay Raut (Photo Credit - PTI)

केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत गेल्या 30 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, भाजपने शेतकरी जनजागृतीसाठी आणि कृषी कायद्यातील तरतुदी व फायदे समजावून सांगण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. या कायद्यांच्या समर्थनार्थ विधानसभेची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यातून बैलगाडीचा मोर्चा काढून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच "देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्याजवळ असलेल्या बैलांचेही पोषण करण्याची ताकद उरलेली नाही" असा टोलादेखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, शेतकरी आंदोलन संदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांशी चर्चा केली. याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाषण केले. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध घोषणांचे स्वागतच आहे. मात्र, केवळ नरेंद्र मोदी यांच्या काळातच शेतकऱ्यांना फायदा मिळायला लागला आहे, असे म्हणता येणार नाही. देशात पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांच्यापासून ते अगदी मनमोहन सिंग यांचे सरकार असताना शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले गेले आहेत. आपल्या देशात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना महत्व दिले जात आहे. परंतु, दिल्लीत आपल्या मागण्यांसाठी अनेक शेतकरी गेल्या 30 दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र, त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे, ही योग्य बाब नाही," असेही संजय राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- 'अन्यथा काँग्रेस महाविकास आघाडीतील सर्वात तोट्याचा पक्ष ठरेल' विनायकराव देशमुख यांचा कार्यकर्त्यांना इशारा

राज्यात कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधीपक्षांनी आक्रमक भुमिका घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, आज कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ देवेंद्र फडवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातील मांजरीत शेतकरी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात फडणवीस यांनी ठाकरे सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.